Responding to villagers | गाळ उपशाला ग्रामस्थांचा प्रतिसाद
गाळ उपशाला ग्रामस्थांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : यंदा पर्जन्यमान कमी असल्याने भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण हिवाळ््यातच आटले होते. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता या धरणातून स्वत:हून गाळ शेतात नेऊन टाकला आहे.
लोकवर्गणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा या कामात वाढता उत्साह पाहून शासनाने देखील या ठिकाणी एक पोकलेन मशिन उपलब्ध करुन देत शेतकऱ्यांना मदत केली. गेल्या दोन महिन्यांपासून या धरणातील गाळ उपसा रात्रं- दिवस सुरू असून एक शासकीय पोकलेन व सात खाजगी जेसीबीद्वारे गाळ उपसा करून शेतक-यांनी शेकडो टिप्पर गाळ शेतात नेऊन टाकला आहे.
मागील आठवड्यापासून शेतातील कामे सुरू झाल्याने येथील जेसीबींची संख्या घटली आहे. यामुळे वेळेत टिप्पर भरत नसल्याने गाळ वाहतूक करणारी टिप्पर संख्या देखील रोडावली होती. परंतु, शेतक-यांची मागणी जास्त असून, त्यांना गाळ मिळेना. ही बाब शासनाच्या निर्दशनास ग्रामस्थांनी आणून दिली.
ग्रामस्थांनी गाळ उपसा केला
विझोरा, वाढोणा, वडोद तांगडा, लेहा, शेलूद, पोखरी, धावडा, मेहगाळ, जळकी बाजार, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, करजगाव कल्याणी, आन्वा, कोदा, वालसावंगी, पारध खु., पारध बु. इ. गावातील ग्रामस्थ गाळ वाहतूक करत आहेत.
शेती सुपीक होण्यास मदत
शेलूद धरणात महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत गाळमुक्त धरण योजनेतून गेल्या दोन महिन्यांपासून गाळ उपशाचे काम सुरु आहे. पूर्वी शासनाचे एकच पोकलेन होते. आता आणखी एक पोकलेन उपलब्ध करुन दिल्याने गाळ उपशाला गती मिळाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शेतक-यांची जमीन सुपीक होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.


Web Title: Responding to villagers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.