अवैध वाळू उपसा प्रकरणात जालन्यात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:10 IST2019-06-27T14:07:49+5:302019-06-27T14:10:11+5:30
अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासणार

अवैध वाळू उपसा प्रकरणात जालन्यात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले
जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी चौकशी करून जबाब नोंदवले. याचवेळी त्या भागातील तीन वाळू कंत्राटदारांचीही चौकशी करण्यात आली. गेल्या वर्षभरातील या अधिकाऱ्यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना आणि बीड जिल्ह्यांतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत असल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड आणि जालना जिल्ह्यांतील महसूल तसेच पोलीस दलातील वाळूशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी बिनवडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेत चौकशी केली. त्यातील वास्तव काय आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेतले.
यावेळी आर्थिक देवाणीचा आरोप अधिकारी, कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. त्यात तथ्य नसल्याचा दावा संबंधित चौकशीस सामोरे जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, एवढ्यावर समाधान न मानता या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचा गेल्या वर्षभरातील सीडीआर तपाण्यावरही विचार झाल्याचे सांगण्यात आले.
तुषार निकम यांनी गौण खनिज विभागाचा पदभार घेऊन एक महिना झाला असल्याचे सांगण्यात आले. चंडोल हे भोकरदन येथून महिन्याभरापूर्वीच अंबड येथे बदलून गेले आहेत. त्यामुळे आमचा या प्रकरणांशी संबंध नसल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी ज्यांच्याकडे जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांचा पदभार होता, त्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अवैध वाळू उपसाप्रकरणी तत्कालीन गौण खनिज अधिकारी पाटील आणि नायब तहसीलदार संदीप ढाकणे हे निलंबित झाले होते. त्यांना तत्कालीन आयुक्तांनी निलंबित केले होते. त्यांनी त्यांच्या या निलंबनाला मॅटमध्ये आव्हानही दिले आहे.
वाळूमाफियांना नऊ कोटींचा दंड
वर्षभरात अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी महसूल तसेच पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जवळपास १९४ प्रकरणांमध्ये १०३ गुन्हे दाखल केले असून, त्यांना ८ कोटी ७५ लाखांचा दंड आकारला आहे. त्यापैकी ८७ लाख २४ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात दहा अधिकाऱ्यांवर वाळूमाफियांनी हल्ले केले असून, त्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एका वाळूमाफियाविरूद्ध एमीडीएअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यांची झाली चौकशी
उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने, घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा गौण खनिज अधिकारी तुषार निकम, नायब तहसीलदार वंदना शंडूलकर, वाय.एन. दांडगे, बी.के. चंडोल, संदीप मोरे, मंडळ अधिकारी दिगंबर कुरेवाड, पोलीस निरीक्षक शशिकांत देवकर, अनिरुद्ध नांदेडकर, अतुल एरमे, शैलेश रायकर, रामदास राख, नासीर मुसा सय्यद.