'आरपारच्या लढ्यास सज्ज'; महिनाभराची शिदोरी घेत मुंबईकडे निर्धाराने निघाले मराठा आंदोलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 14:31 IST2025-08-27T14:30:31+5:302025-08-27T14:31:45+5:30
मराठा आरक्षणासाठी हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने, आरक्षण मिळेपर्यंत हटणार नसल्याचा निर्धार

'आरपारच्या लढ्यास सज्ज'; महिनाभराची शिदोरी घेत मुंबईकडे निर्धाराने निघाले मराठा आंदोलक
- अशोक डोरले
अंबड: ओबीसीतून 'सगेसोयरे' आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने आज सकाळी रवाना झाला आहे. अंतरवाली सराटीतून निघालेल्या या मोर्चात पुढे हजारो वाहने, टेम्पो आणि दुचाकींवरील आंदोलक सहभागी झाल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर फक्त आरक्षणाचा आवाज घुमत होता. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबईतील आझाद मैदानातील ठाण सोडणार नाही, असा निर्धार महिनाभराची शिदोरी घेऊन निघालेल्या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना 'ही आरपारची शेवटची लढाई' असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कितीही वेळ लागला तरी मुंबई सोडायची नाही, या तयारीनिशी मराठा बांधव घराबाहेर पडले आहेत. गावोगावी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत आहेत. संपूर्ण जालना जिल्हा आणि परभणी, बीड जिल्ह्यातून अनेक युवक दोन महिन्यांचा किराणा, गॅस शेगडी, भांडी आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन मुंबईकडे निघाले आहेत.
मराठवाड्यातून मुंबईकडे हजारोंची कूच
मराठवाड्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव गेल्या दोन दिवसांपासून अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. अंबड शहरासह परिसरात त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलकांसोबत खाण्यापिण्याच्या वस्तूंचा मोठा साठा असलेली वाहनेही मुंबईकडे रवाना झाली आहेत. यात अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगावमधून आंदोलकांसाठी पाच टन पुऱ्या पाठवण्यात आल्या आहेत.
मुंबईतही स्वयंसेवकांची तयारी
आंदोलक मुंबईला पोहोचेपर्यंत रस्त्यात ठिकठिकाणी पाणी, नाश्ता, जेवण आणि आरोग्याच्या सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत पोहोचल्यावरही स्वयंसेवकांनी आंदोलकांच्या राहण्याची आणि जेवणाची तयारी केली आहे.
मोर्चाचा मार्ग आणि आजचा मुक्काम
बुधवारी अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा जुन्नर, राजगुरूनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करून २८ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहे. आज या मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे असेल.