कडक उन्हात पावसाची सर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:32 IST2019-04-05T00:31:38+5:302019-04-05T00:32:16+5:30
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

कडक उन्हात पावसाची सर !
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली होती.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीसह परिसरातील काही गावांमध्ये गुरूवारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तीर्थपुरी, भायगव्हाण, बाचेगाव, दहिगव्हाण, खापरदेव, हिवरा आदी गावांमध्ये पाऊस झाला. सध्या स्थितीत अनेक ठिकाणी गहू, हरभऱ्याची काढणी व खळे चालू होते. परंतु, अचानक पाऊस आल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे.
कुंभार पिंपळगाव परिससरात गुरूवारी सायंकाळी पाच वाजता एक तासाहून अधिक वेळ अवकाळी पावसानं हजेरी लावली. तर पिंपरखेड, जांब, मूर्ती, शिंदखेड, राजटाकळीसह परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हळद, कांदा, गहू, पिकांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे.
मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडात जोरदार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या या वादळी वाºयामुळे बसस्थानक परिसरात व्यापाऱ्यांची मोठी दैना उडाली. तर अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली. विजेच्या ताराही तुटल्या असून शेडनेटचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
कुंभार पिंपळगाव : वीज पडून महिलेचा मृत्यू
कुंभार पिंपळगाव : शेतातून घरी येत असताना वीज पडून ३४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील सिरसवाडी येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. कुंभारपिंपळगाव येथील आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा खंडित असल्याने शवविच्छेदन करण्यास अडचण आली होती. यामुळे महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी घनसावंगी येथे नेवून शवविच्छेदन केले. दरम्यान या महिलेसोबत असलेल्या दोन बक-या देखील वीज पडून ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.