जालना बसस्थानक परिसरातील कुंटणखान्यावर धाड; ८ पुरुष जेरबंद, चार महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:05 IST2025-12-11T12:05:26+5:302025-12-11T12:05:48+5:30
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

जालना बसस्थानक परिसरातील कुंटणखान्यावर धाड; ८ पुरुष जेरबंद, चार महिलांची सुटका
जालना : शहरातील बसस्थानक परिसरातील न्यू शिवगंगा लॉज येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई करीत आठ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून, चार महिलांची सुटका केली. ही कारवाई पोलिस दलांतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास केली.
जालना शहरातील बसस्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉज येथे मालक संदीप पांडुरंग राऊत हा स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरून महिलांना लॉजमध्ये आणून कुंटणखाना चालवित असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री लॉजवर कारवाई केली. त्यावेळी लॉजचा मालक संदीप पांडुरंग राऊत, मॅनेजर बाळासाहेब अंकुश जगताप (वय-३२ रा.घोटन ता.बदनापूर), निखिल शेषराव हिवाळे (वय २२, रा. खासगाव, ता. जाफराबाद), राजू नाना गव्हाड (वय २७, रा. सिंदखेडराजा), अनिल वामनराव हिवाळे (वय २९, रा. कुंभारी), गणेश भाऊसाहेब ओळेकर (वय ३०), शिवाजी भाऊराव ओळेकर (वय ३०, दोघे रा. तळणी, ता. बदनापूर), अमोल जगन जंजाळ (वय ३०, रा. कुंभारी, ता. जाफराबाद) यांना अटक केली. तसेच चार पीडित महिलांची सुटका केली. त्यांच्याकडून एक लाख एक हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोउपनि गणेश शिंदे यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश शिंदे, पोउपनि रवी जोशी, पोहेकॉ कृष्णा देठे, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलिस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केली.