बदनापूर (जि. जालना) : आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( raosaheb danve) यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे ( Congress ) खासदार आणि नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्यावर टीका करताना दानवे यांची जीभ घसरली. राहुल गांधींना त्यांनी चक्क ‘देवाला सोडलेला वळू’ संबोधून वाद ओढवून घेतला आहे. ( Rahul Gandhi means ‘bull left to God’; Raosaheb Danve's tongue slipped again )
शुक्रवारी दुपारी भाजपची जनआशीर्वाद यात्रा ( BJP's Jan Ashirwad Yatra ) बदनापूर येथे पोहोचली. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कुठलेच काम नसून, ते म्हणजे आपण ज्याप्रमाणे देवाला वळू सोडतो, त्याप्रमाणे ते वागतात. त्या वळूला काहीच काम नसते, तो केवळ गावात इकडून-तिकडे भटकत असतो, असे सांगून हे खरे आहे की नाही? असा सवालही सभेस उपस्थित नागरिकांना केला. बोलण्याच्या ओघात दानवेंची जीभ पुन्हा घसरल्याने त्याचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रात उमटत आहेत.
या आधीदेखील दानवेंनी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना शेतकरीविरोधी वक्तव्यासह कांदा दरवाढीत पाकिस्तानचा हात असल्याचा उल्लेख करून मोठे वादळ उठविले होते. दानवेंनी गुरुवारी (दि. १९) रात्री जालन्यातील कार्यक्रमातही अनेक किस्से सांगून हनीमूनसह मांडवपरतणीचा उल्लेख करून सर्वांना अवाक् केले होते.
काँग्रेसकडून निषेधकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तीव्र शब्दात निषेध केला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याएवढी दानवे यांची लायकी नसल्याचा टोला जालना जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी लगावला. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख आणि शहराध्यक्ष शेख महेमूद यांनीही दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.