छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:14 IST2024-12-17T14:12:37+5:302024-12-17T14:14:07+5:30
यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
अंबड: राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान न दिल्याने अंबड येथे सकल ओबीसी समाजाच्यावतीने महात्मा फुले चौकात आज सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.
ओबीसी नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद देण्यात आले नाही. याच्या निषेधार्थ आज सकाळी अंबड शहरांमध्ये सकल ओबीसी समाजाकडून महायुती सरकार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. मंत्रिपद न मिळाल्याने राज्यभरातील भुजबळ समर्थक, ओबीसी समाजात नाराजीची भावना असल्याचे आंदोलकांनी सांगितले. तसेच यावेळी महायुती सरकार, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अजित पवार यांच्या प्रतिमेला आंदोलकांनी जोडे मारून आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनात रवींद्र खरात, नंदू पुंड, रामशेठ लांडे, संदीप दादा खरात, दिनेश गाजरे, डॉ. अभय जाधव, शिवा गाजरे, दिलीप राठोड, किशोर मुर्तडकर, गोरख हिरे, संतोष राऊत, परमेश्वर राऊत, योगेश राऊत, ईश्वर पिराने, बाबासाहेब बटुळे, बाळू गावडे, बाळासाहेब दखणे, परमेश्वर भागवत , किरण रहाटगावकर, प्रदीप जीवने, कैलास गादे आदींचा सहभाग होता.