भोकरदनमध्ये पोलिस बंदोबस्तात ३०० अतिक्रमणे काढली, मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By दिपक ढोले | Updated: March 9, 2023 19:21 IST2023-03-09T19:20:54+5:302023-03-09T19:21:08+5:30
चार जेसीबींच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला आहे.

भोकरदनमध्ये पोलिस बंदोबस्तात ३०० अतिक्रमणे काढली, मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास
भोकरदन : भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कुंभारी पाटीपर्यंतच्या रस्त्यावरील ३०० अतिक्रमणे गुरुवारी पोलिस बंदोबस्त काढण्यात आली आहे. अतिक्रमणे काढताच, रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. यासाठी पोलिस अधिकाऱ्यांसह २०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भोकरदन-राजूर या रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे; परंतु, भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कुंभारी पाटीपर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ३०० अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन अतिक्रमण काढून घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बहुतांश जणांनी स्वत: अतिक्रमण काढून घेतले. उर्वरित अतिक्रमणे गुरुवारी पोलिस अधिकारी व २०० कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात काढण्यात आली आहे.
चार जेसीबींच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला आहे. शिवाय, विसावा मारोती मंदिर, टिपू सुलतान चौक, अण्णा भाऊ साठे चौकही काढण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, तहसीलदार सारिका कदम, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता ए. व्ही. शिरभाते, कनिष्ठ अभियंता आर. आर. शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे, सपोनि. रत्नदीप जोगदंड, संतोष घोडके, राजाराम तडवी, वैशाली पवार, रवींद्र ठाकरे, तलाठी कल्याण माने यांनी केली.