आजपासून जालन्यात राष्ट्रीय पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:45 IST2019-02-02T00:44:13+5:302019-02-02T00:45:31+5:30
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आजपासून तीन दिवसांचे राष्ट्रीय पातळीवरील पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

आजपासून जालन्यात राष्ट्रीय पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन
जालना : जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आजपासून तीन दिवसांचे राष्ट्रीय पातळीवरील पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे राहणार असल्याची माहिती संयोजक पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. या प्रदर्शनाची अंतिम तयारी झाली असून, अनेक जातिवंत पशू-पक्षी प्रदर्शनासाठी जालन्यात दाखल झाले आहेत.
सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचा शुभारंभ होणार असून, यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निंलगेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. जवळपास ५० एकर पेक्षा अधिक जागेवर हे प्रदर्शन होत असून, तीन मोठे मंडप तर अन्य लहानमोठी अशी ७० पेक्षा अधिक दालने उभारण्यात आली आहेत. या पशुसंवर्धनात अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या प्रदर्शनात नील गायी, जातिवंत घोडे, सुल्तान रेडा आणि अन्य अनेक जनावरांचा समावेश राहणार आहे. यातील सुल्तान रेडा हा दाखल झाला असून, तो ९ कोटी रूपयांचा असल्याचे सांगण्यात आले. पंजाब तसेच अन्य राज्यातून जातिवंत घोडे तसेच उंट, शेळ्या, मेंढ्या तसेच जास्तीचे दूध देणाऱ्या म्हशी येथे दाखल झाल्या आहेत. हे प्रदर्शनाची अंतिम तयारीची पाहणी शुक्रवारी सकाळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, भरत पाचफुले, दादाराव पाचफुले, संजय खोतकर आदींची उपस्थिती होती.