बदनापूर (जि. जालना) : पुण्याहून पुसदकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसमध्ये (एमपी ९ डीपी ९९२५) एका व्यक्तीचा जळाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान बदनापूर तालुक्यातील पीरसावंगी फाट्यावर घडली. सुनील सज्जनराव टाले (वय ५०, रा. आरेगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सुनील टाले यांनी स्वत:च्या अंगावर पेट्राेल टाकून जाळून घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळी ५:३० वाजता बसमधून वास येऊ लागल्याचे काही प्रवाशांनी चालकास सांगितले. चालकाने बस तात्काळ निरंकारी पेट्रोलपंपाजवळ थांबवली. बसची तपासणी केली असता सीट नंबर १२ वरील सुनील सज्जनराव टाले हे प्रवासी पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले. दरम्यान, ट्रॅव्हल्स बस पुणे येथून शनिवारी रात्री सात वाजता पुसदकडे निघाली होती.
या बसमध्ये पुणे येथे मजुरी काम करणारे सुनील टाले प्रवास करीत होते. टाले हे पुणे येथून गावाकडे गौरीच्या पूजनाला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्समध्ये बसले होते. ही ट्रॅव्हल्स पीरसावंगी फाट्याजवळ आल्यानंतर सुनील टाले यांचा पेटल्यामुळे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बदनापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्यासह सहायक फौजदार बाबासाहेब जऱ्हाड, पवन नारियलवाले, दासार आणि होमगार्ड हे घटनास्थळी पोहोचले.
मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार बाबासाहेब जऱ्हाड करीत आहेत.
प्रवाशांची आरडाओरडट्रॅव्हल्स चालक सुनील धोंडबा इंगोले यांनी सांगितले की, बसमध्ये उग्र वास आल्याने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. यानंतर बसच्या तपासणीमध्ये सीटनंबर १२ वरील प्रवासी सुनील टाले यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचे दिसून आले. तेव्हा मी व गाडीतील प्रवाशांनी पाणी तसेच गाडीमधील अग्निशमन यंत्राद्वारे आग आटोक्यात आणली. टाले यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील डॉ. गीते यांनी तपासून मयत घोषित केले, असे ट्रॅव्हल्स चालक सुनील इंगोले यांनी सांगितले.