'एका जातीला पायघड्या, दुसऱ्या जातींची उपेक्षा', ओबीसी आंदोलकांचा स्वतःला संपविण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:21 IST2025-09-04T12:20:17+5:302025-09-04T12:21:16+5:30
अंतरवाली सराटीतल्या ओबीसी उपोषणाचा आजचा चौथा दिवस; मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच राहणार

'एका जातीला पायघड्या, दुसऱ्या जातींची उपेक्षा', ओबीसी आंदोलकांचा स्वतःला संपविण्याचा इशारा
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : 'एका जातीसाठी पायघड्या तर दुसऱ्या जातींची उपेक्षा', असे सरकारचे पक्षपाती वागणे असल्याची टीका अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी केली. ओबीसीच्या लेकरांच्या न्याया करता आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत. सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेत नसेल तर मी उद्या आत्मदहन करणार, असा इशारा ओबीसी आंदोलक बाबासाहेब बटुळे यांनी दिला आहे.
अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या ओबीसी आरक्षण बचावसाठीच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या मंजूर करून शासनाने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे , विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाचा दखल घेतलेली नाही. सकाळी आलेल्या डॉक्टरांना उपोषणकर्त्यांनी तपासणी देखील करू दिली नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील असे ओबीसी आंदोलक विठ्ठल तळेकर यांनी सांगितले.
काय आहेत मागण्या?
ओबीसी उपसमितीने उपोषणस्थळी भेट देऊन आम्हाला आश्वस्त करावं.
सरकारने मराठा समाजाविषयी काढलेला जीआर रद्द करावा.
मनोज जरांगे यांची एसआयटीमार्फत सुरु असलेल्या चौकशीचा अहवाल शासनाने सादर करावा
प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फोनकरून उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच आंदोलनस पाठिंबा असल्याचे जाहीर केले.