कार पळविण्याचा ‘त्याचा’ जुनाच धंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:52 IST2018-11-21T00:52:26+5:302018-11-21T00:52:42+5:30
ल्याणवरुन नांदेडकडे जाण्यासाठी कार भाड्याने करुन निघालेला अट्टल कार चोर शेख शकील शेख युसूफ याने चहा पिण्यासाठी उतरलेल्या चालकाची नजर चुकवून सात लाख रुपये किमतीची कार लंपास केल्याची घटना मंगळवारी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली.

कार पळविण्याचा ‘त्याचा’ जुनाच धंदा
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : कल्याणवरुन नांदेडकडे जाण्यासाठी कार भाड्याने करुन निघालेला अट्टल कारचोर शेख शकील शेख युसूफ याने चहा पिण्यासाठी उतरलेल्या चालकाची नजर चुकवून सात लाख रुपये किमतीची कार लंपास केल्याची घटना मंगळवारी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली.
तालुक्यातील शेलगाव येथे मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान येथील सरकारी दवाखान्यासमोर ही घटना घडली. कल्याणहून नांदेड येथे एका पांढऱ्या रंगाच्या कार (क्र. एमएच-०२ ईयू ६४१५) ने ग्राहकास भाडे तत्त्वावर घेऊन जात असताना चालक चहा पिण्यासाठी गाडी सुरू ठेवून हॉटेलकडे गेला होता. ही संधी साधत शेख शकीलने कार पळवून नेल्याने चालक अवाक झाला. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात कारचा चालक शंकर गणेश कदम (रा. मुंबई) याने तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या संशतित आरोपींचे फोटो कारचालक शंकर कदमला दाखविले. त्याने लगेचच त्यातील एका आरोपीचा फोटो ओळखून हाच तो इसम असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांंनी सदर आरोपीची माहिती काढली असता, शेख शकील शेख युसूफ असे त्याचे नाव असल्याचे दिसून आले. त्याने यापूर्वीही या भागातून पाच ते सात कार अशाच प्रकारे लांबविल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी सांगितले. याच प्रकरणात शेख युसूफ यास अटक केली होती. परंतु आता त्याने नव्याने हा गुन्हा केला आहे. त्याला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येणार असल्याचेही खनाळ यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक राजपूत हे करत आहेत. शेख युसूफ हा बुलडाणा येथील जवाहरनगर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.