Old bridge collapses; Survival survived ... | जुनाट पूल कोसळला; जीवित हानी टळली ...
जुनाट पूल कोसळला; जीवित हानी टळली ...

लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : येथील पूर्णा नदीवरील निजामकालीन पूल बुधवारी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. हा पूल जालना- जळगाव मार्गावरील आहे.
सन १९३४ च्या दरम्यान हा पूल दळणवळणाच्या साधणासाठी जालना- जळगाव मार्गावर येथील पूर्णा नदीपात्रात उभारण्यात आला होता. परंतु, मागील बारा वर्षांपूर्वी पूल जीर्ण झाला असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते.
बांधकाम पूर्ण होताच नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वाहनधारक जुन्या पुलाचाच वाहतुकीसाठी वापर करित होते. यामुळे तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.
याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या पुलावरून होणारी वाहतुक बंद असल्याचे फलक पुलाच्या दोन्ही बाजूंनी लावले होते. तरीही पुलावरून दुचाकीस्वारांसह काही वाहनचालक जात होते. वाळुची अवैध वाहतूक करणारे वाहनचालकही याच पुलाचा वापर करत होते. गत महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे पूर्णा नदीला पाणी वाहत आहे. याच दरम्यान या पुलावरून अवजड वाहने जात असल्याने बुधवारी सकाळी अचानक पूल कोसळला. सुदैवाने पूल कोसळताना पूलावर कोणीही नसल्याने अनुचित प्रकार टळला आहे. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी येथे भेट दिली. पुलाच्या दोन्ही बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पूर्णा नदीवरील दोन्ही पुलांच्या खाली अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात आहे. यामुळे निजामकालीन पुलाचा पाया उघडा पडून पुलाला धोका निर्माण झाला होता. याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. यातच या पुलावरून वाळू वाहतूक करणारे वाहने जात होती. यामुळे हा पूल पडला असल्याचे सांगितले जात आहे. यापुढे नवीन पूलाखालील वाळू उत्खनन रोखण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

सदरील पूल जीर्ण झाल्याने नवीन पूल तयार करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वाहनधारक जुन्या पुलाचाच वापर करत होते. यामुळे आम्ही जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी पूल बंद असल्याचे फलक लावले होते. मात्र, अवैध वाळू वाहतूक करणाºयांनी हे फलक काढून फेकून दिली होती. वाहतुकीसाठी याच पुलाचा वापर करत होते. शिवाय पुलाखालून वाळू उपसा होत असल्याचे आम्ही भोकरदन तहसीलदारांना सांगितले होते.
- डी. एन. कोल्हे, उपअभियंता. सा. बां. विभाग.

 

Web Title: Old bridge collapses; Survival survived ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.