'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:30 IST2025-08-26T07:29:15+5:302025-08-26T07:30:16+5:30
बॅनरबाजी करणाऱ्या आमदार सोळुंके, पंडित यांनी राजीनामा देऊन जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हावं

'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
वडीगोद्री (जि. जालना) :आमदार प्रकाश सोळुंके, विजयसिंह पंडित यांनी राजीनामा देऊन जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंडल यात्रेवरही टीका केली.
गेवराई येथे झालेल्या राड्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोमवारी रात्री वडीगोद्री येथे माध्यमांशी संवाद साधला. गेवराई तालुक्याच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गेवराईमध्ये माझा पुतळा जळला. तुम्ही चौकाचौकात बॅनर लावता हे आमदारला शोभणार कृत्य आहे का? प्रकाश सोळुंके, विजयसिंह पंडित यांनी राजीनामा देऊन जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं. तुम्ही आम्हाला भटके कुत्रे म्हणता. अजित पवार नावाचा जातीवादी उपमुख्यमंत्री या प्रश्नावर बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री ओबीसी आमचा डीएनए आहे म्हणतात. परंतु, २० महामंडळे तयार केली. त्यावर अध्यक्ष नियुक्त केले नाहीत आणि महामंडळाला निधीही उपलब्ध करून दिला नाही, असेही हाके म्हणाले.
वडीगोद्रीत बंदोबस्त वाढविला
गेवराईच्या राड्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे आले होते. या ठिकाणी ओबीसी बांधव जमा झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तातडीने या भागात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. वडीगोद्री गावातही गस्त लावण्यात आली आहे.
ओबीसी रस्त्यावर उतरतील
जरांगे मुंबईला जात असतील, तर त्याला रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. ओबीसी आरक्षण वाचायचे असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल. जरांगे यांना रिझर्व्हेशनचे स्पेलिंग लिहिता येत नाही, अशी टीकाही हाके यांनी केली.