ओबीसी समाजाने भाजपविरोधात मतदान करून राग व्यक्त करावा: प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:25 IST2025-11-11T15:20:10+5:302025-11-11T15:25:02+5:30
मराठा - ओबीसी वाद हा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे. त्यामुळे सत्ता कॅप्चर केल्याशिवाय २ सप्टेंबरचा जीआर रद्द होणार नाही.

ओबीसी समाजाने भाजपविरोधात मतदान करून राग व्यक्त करावा: प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
जालना : येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदारांनी भाजपविरोधात मतदान करून आपला राग व्यक्त करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेला २ सप्टेंबरचा जीआर चुकीचा आहे, असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. जालना येथे ओबीसी व भटके विमुक्त महासंघाच्या वतीने शासनाने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात काढलेला जीआर रद्द करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा - ओबीसी वाद हा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे. त्यामुळे सत्ता कॅप्चर केल्याशिवाय २ सप्टेंबरचा जीआर रद्द होणार नाही. यामुळे ओबीसींचा राजकीय विरोधक भाजप हा पक्ष आहे. येत्या निवडणुकीत ओबीसी मतदारांनी भाजपविरोधात मतदान करून आपला राग व्यक्त करावा, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उलट्या - सुलट्या आघाड्या केल्या जात आहेत. यामुळे नेमके कोण कुणासोबत आहे हेच कळत नाही, असे ते म्हणाले.
शरद पवार उमेदवारी देणार नाहीत
शरद पवार यांचे राजकारण मी गेल्या ४० वर्षांपासून बघत आहे. त्यांनी जर ए म्हटले, तर मी त्याचा अर्थ झेड असा काढतो, असे सांगत शरद पवार एकाही मूळ ओबीसीला उमेदवारी देणार नाहीत, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. तसेच मनोज जरांगे यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांविषयी बोलताना ते म्हणाले, मनोज जरांगे यांचे ते इंटरनल भांडण आहे. धमक्या देणारे जरांगे यांचेच जुने साथीदार आहेत. या प्रकरणात मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना इन्व्हॉल्व केले आहे, असे म्हणत आंबेडकर यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली.