हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक;अंतरवालीत GR ची होळी करत शासनाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:44 IST2025-09-03T13:43:52+5:302025-09-03T13:44:50+5:30
'हा जीआर आमच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे,' असे आंदोलकांनी म्हटले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक;अंतरवालीत GR ची होळी करत शासनाचा निषेध
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या हैद्राबाद गॅजेट लागू करण्याच्या जीआर विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषण ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी या जीआरची होळी करत शासनाचा निषेध नोंदवला आहे. 'हा जीआर आमच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे,' असे आंदोलकांनी म्हटले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये या मागणीसाठी जरांगे-पाटील यांच्या उपोषणस्थळीच ओबीसी समाजाने आंदोलन सुरू केले आहे. अंतरवाली सराटीमधील सोनियानगरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी बांधवांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. उपोषणस्थळी शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरची होळी ओबीसी बांधवांकडून करण्यात आली.
ओबीसींचा घात करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने शब्दछळ करून सगेसोयरे लागू करण्याच्या जीआरमधून केला आहे. झोपेत धोंडा घालण्याचं काम मुख्यमंत्री यांनी केल्याने या जीआरचा निषेध करत आम्ही त्याची होळी केली. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आमच्या लेकरांबाळाच्या आरक्षणाचे संरक्षण करणार असल्याचे ओबीसी आंदोलक विठ्ठल तळेकर यांनी सांगितले. तसेच आता अंतरवाली सराटीतून ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी सर्वात तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील तळेकर यांनी दिला.
ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसणारा जीआर
शासनाने जो हैद्राबाद गॅजेटचा जीआर काढला तो ओबीसी च्या पाठीत खंजीर खुपसणारा जीआर आहे.
एकीकडे देवेंद्र फडवणीस साहेबांनी म्हणायचं की ओबीसी आमच्या डीएनए आहे. ओबीसीचा घात करण्याचं काम या महायुती सरकारने केल असल्याची टीका ओबीसी नेते बळीराम खटके यांनी केली आहे. ओबीसी बांधवांनी रस्त्यावरील लढाई लढण्याची गरज आहे. ओबीसींचा विश्वास मुख्यमंत्र्यावर होता मात्र मुख्यमंत्री यांनी आमचा घात केला, अशी टीका खटके यांनी केली.