मला कोरोनाबिरोना काही झालेला नाही... घरीच उपचार घेऊन बरा होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:00+5:302021-05-20T04:32:00+5:30
जालना : मला कोरोनाबिरोना काही झालेला नाही, मी घरीच उपचार घेऊन बरा होईल, असे म्हणत अनेक जण घरीच थांबत ...

मला कोरोनाबिरोना काही झालेला नाही... घरीच उपचार घेऊन बरा होईल
जालना : मला कोरोनाबिरोना काही झालेला नाही, मी घरीच उपचार घेऊन बरा होईल, असे म्हणत अनेक जण घरीच थांबत आहेत. त्यामुळे घरातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण होत आहे. परिणामी, ग्रामीण भागात आजघडीला घराघरात पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. याची प्रशासनाला ही खबर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण निघत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवांना मुभा दिलेली आहे. शिवाय, नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच चाचणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहनही शासनाकडून केले जात आहेत ; परंतु ग्रामीण भागातील नागरिक दुखणे अंगावर काढत आहेत. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असतानाही कोरोना चाचणी करीत नाहीत. घरीच थांबत असल्याने घरातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले बहुतांश जण आजारी पडत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. लोक घरीच आपापल्या पद्धतीने उपचार करीत असल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेच आजघडीला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
ग्राम दक्षता समित्या नावालाच
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या उपाययोजना गावात करण्यासाठी प्रत्येक ग्राम दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. बहुतांश गावांत ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे, तर काही गावांत अद्यापही ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली नाही. ज्या गावात ग्राम दक्षता समिती आहे त्या नावालाच आहेत.
ग्रामसेवकांचे ही दुर्लक्ष
गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती प्रशासनाला देण्याचे काम ग्रामसेवकाचे आहे ; परंतु ग्रामसेवक ही संबंधित माहिती प्रशासनाला देत नाही. त्यामुळे लोक घरीच उपचार घेत आहेत. गावात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
आकडेवारी
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह २५,८३७
ग्रामीण भागातील मृत्यू ४०८