'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:46 IST2025-01-27T13:19:52+5:302025-01-27T13:46:36+5:30
बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस: मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या: मनोज जरांगे

'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : आम्ही खुनशी नाही, आमची कुणाला ना नाही, आम्ही जातीयवादी नाही, आम्ही काय दहशतवादी आहे का ? असा सवाल करत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या चर्चेच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आमचं लोकांबद्दल वाईट मत नाही. आमची कोणाला ना नाही. सगळं देश इथे येऊन गेला आहे, असे म्हणत पालकमंत्री मुंडे यांच्या भेटी संदर्भात निरोप पाठवेन आणि त्यांच्या निरोपची वाट पाहिलं या व्यक्तव्यावर जरांगे यांनी मत व्यक्त केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधवही उपोषणाला बसले आहेत.आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने संपर्क करण्याची आवश्यकता नाही. त्यांची गरज नाही. समाजाला शत्रू कोण हे कळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. माझ्या मनात काही नाही, मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या मान्य करा, असे उत्तर त्यांनी उदय सामंत यांना दिले.
देशमुख कुटुंबांनी सहभागी होण्याची गरज नाही ते दुःखात आहे. मी बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळे झाले यांचे व्हायला नको. अशोक चव्हाण भेटीला येणार आहे, यावर बोलताना जरांगे म्हणाले, मध्यस्थी त्यांनी करावी, की दुसऱ्या कोणी आमची ना नाही. आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. आमच्या लोकांचं वाटोळे होत आहे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे ते कळू द्या गुंडगिरी संपवायची की राहू द्यायची, अशी टिका संतोष देशमुख प्रकरणावर जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्यासह १०२ जण उपोषणाला
मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्यासोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून सकाळी तपासणी करण्यात आली. जरांगे यांची ब्लडशुगर खालावली आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वैष्णवी नरवडे यांनी दिली आहे.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे
''त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तेथील वातावरण कसे असते, ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन'', असे जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेटीवर प्रतिक्रिया दिली होती.