सुखद ! जालना ते खामगाव रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:54 IST2021-01-05T12:50:11+5:302021-01-05T12:54:32+5:30
New survey for Jalna to Khamgaon railway line : २०१२ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचे संपूर्ण सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे नमूद केले होते.

सुखद ! जालना ते खामगाव रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण
जालना : जालना ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव या रेल्वे मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी मुंबईस्थित मध्य रेल्वे कन्स्ट्रक्शन विभागाचे एक पथक ४ ते ८ जानेवारीदरम्यान विविध गावे, बाजार समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या मार्गावरील वाहतुकीसंदर्भातील सद्य:स्थिती जाणून घेणारा अहवाल ते रेल्वेला सादर करणार आहेत.
या सर्वेक्षणाच्या कामासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आ. संतोष दानवे यांनी दिली. विदर्भातील खामगाव ते जालनादरम्यान रेल्वे मार्ग करण्याची जुनी मागणी आहे. या मार्गासाठी इंग्रजांच्या काळात काही ठिकाणी कामही सुरू झाले होते; परंतु नंतर हा मार्ग मागे पडला. मध्यंतरी जालना आणि खामगाव येथेही रेल्वे संघर्ष समिती, उत्तर भारतीय संघ, तसेच मराठवाडा विकास परिषदेच्या माध्यमातून अथक प्रयत्न केले.
२०१२ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचे संपूर्ण सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे नमूद केले होते. त्यानुसार हे सर्वेक्षण झाले होते; परंतु सर्वेक्षण पथकाने हा मार्ग रेल्वेस प्रवासी, तसेच मालवातुकीसाठीदेखील आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला दिला होता. ही वस्तुस्थिती असताना या मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वेच्या मुंबई येथील मध्य रेल्वे बांधकाम विभागाने पुढाकार घेत पाहणीसाठी एक पथक पाठविले आहे. या पथकातील सदस्य मंगळवारी जालन्यातील बाजार समिती, रेल्वे विभाग, उद्योग केंद्र, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, परिवहन विभागांशी संपर्क साधून वाहतुकीसंदर्भात माहिती जाणून घेऊन अहवाल तयार करणार आहेत.
जालना ते खामगाव रेल्वे मार्ग झाल्यास नागपूरसह पूर्वेकडील राज्यांना जालना जोडला जाणार आहे. त्याचा मोठा लाभ जालना येथील प्रवाशांसह मालवाहतुकीला होणार आहे. याच मार्गाप्रमाणे २०१२ मध्ये सोलापूर ते जळगाव हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणूनही सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, त्यातही पुढे काहीच झालेले नाही.
प्रत्यक्ष भेटून सर्वेक्षण व्हावे
जालना-खामगाव मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. मध्य रेल्वेच्या वाहतूक सर्वेक्षण पथकाने जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र, बाजार समिती, परिवहन महामंडळ, ट्रान्स्पोर्ट एजन्सी आदी यंत्रणांकडून याबाबतची वस्तुस्थिती प्रत्यक्ष भेटून जाणून घ्यावी. २०११ मध्ये केलेले सर्वेक्षण संबंधित यंत्रणांशी प्रत्यक्ष न भेटता परस्पर केले होते. त्यामुळे महसुलाचा परतावा उणेमध्ये दर्शविण्यात आला होता.
- ॲड. डी. के. कुलकर्णी, सहसचिव रेल्वे संघर्ष समिती, जालना.