जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेल्या मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By विजय मुंडे | Updated: March 26, 2024 18:56 IST2024-03-26T18:56:44+5:302024-03-26T18:56:53+5:30
ऐन धूलिवंदन सणादिवशीच मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेल्या मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
जालना : जनावरांसाठी शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कडवंची (ता. जालना) शिवारात सोमवारी दुपारी ऐन धूलिवंदनाच्या दिवशी घडली.
सुमित्रा माणिकराव वानखेडे (वय ४०), समाधान माणिकराव वानखेडे (वय २२, रा. कडवंचीवाडी ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत. कडवंची गावांतर्गत कडवंचीवाडी येथील सुमित्रा माणिकराव वानखेडे आणि त्यांचा मुलगा समाधान माणिकराव वानखेडे हे दोघे सोमवारी दुपारी शेतात गेले होते. वीजपुरवठा खंडित असल्याने जनावरांसाठी ते शेततळ्यातून पाणी काढत होते. परंतु, अचानक आतमध्ये पडल्याने बुडून दोघांचा मृत्यू झाला. ते शेततळ्यात पडल्यानंतर काही वेळाने त्यांचा लहान मुलगा तेथे आला. त्याने ही घटना काका विनायक वानखेडे यांना सांगितले. यानंतर विनायक वानखेडे व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना शेततळ्याच्या बाहेर काढून जालना येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ऐन धूलिवंदन सणादिवशीच मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कष्टातून फुलविली हाेती शेती
वानखेडे कुटुंबीय तीन एकर शेतात वेगवेगळे प्रयोग करून उदरनिर्वाह करीत होते. यामध्ये सुमित्रा वानखेडे या सर्वतोपरी मदत करीत होत्या. त्यांनी कष्टातून शेती फुलविली होती. शेतात कष्ट करणाऱ्या सुमित्रा वानखेडे व त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपासून वीजपुरवठा बंद
वानखेडे यांच्या शेतशिवारातील वीजपुरवठा दोन दिवसांपासून बंद होता. त्यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्याचा आधार घ्यावा लागला. शेततळ्यातून पाणी काढत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे नातेवाइकांनी सांगितले.