माता न तू वैरिणी ! स्वत:चे पाप लपविण्यासाठी चिमुकल्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:30 IST2018-10-04T00:30:12+5:302018-10-04T00:30:26+5:30
स्वत:चे पाप लपविण्यासाठी निष्पाप पोटच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून करून घेणारी आई प्रियकरा सोबत गजाआड झाली आहे.

माता न तू वैरिणी ! स्वत:चे पाप लपविण्यासाठी चिमुकल्याचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : स्वत:चे पाप लपविण्यासाठी निष्पाप पोटच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून करून घेणारी आई प्रियकरा सोबत गजाआड झाली आहे. या प्रकरणातील चारही जणांच्या मुसक्या आवळल्या. या चारही संशयित आरोपींना बुधवारी जालना येथील न्यायालयात हजर केले असता विशेष सत्र न्यायाधीश मिश्रा यांनी ६ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोेठडी सुनावली आहे़
तालुक्यातील दावतपुर टाकळी या गावातील यश रमेश मगरे (८) हा मुलगा १ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपासून गायब झाला होता. वडिलांनी त्याचा शोेध घेतला मात्र सापडला नाही म्हणून आज्ञात व्यक्तीनी त्याचे अपहरण केल्याची तक्रार त्याच दिवशी रात्री भोकरदन पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र प्रकरण काही वेगळेच असल्याची शंका पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांना आली व त्यानी ३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्याना सोबत घेऊन दावतपूरला भेट दिली. सुरूवातीला कोणीच काही सांगत नव्हते, शिवाय तो पर्यंत यशचा मृतदेह सापडला नव्हता. मात्र उपविभागीय जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यानी मयत मुलाचे वडील व यातील एका आरोपीच्या वडिलांना भोकरदनला बोलावून कसून चौकशी केली तेव्हा यातील अविनाश मगरे यांच्या वडिलांनी ती महिला व त्यांच्या मुलाच्या प्रेमप्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून अविनाश जयकिरण मगरे याला ताब्यात घेतले तो पर्यंत यशचा चार फूट पाण्यात मृतदेह आढळून आला होता.या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता त्याच्या गळ्या भोवती आवळल्याचे दिसून आले.
पोलिसांनी अविनाश उर्फ सोन्या जयकिरण मगरे याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने मयताची आई सीमा रमेश मगरे हिच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे सांगितले. दत्ता साहेबराव घायवट (२२) व रामधन बाबूराव घायवट (२१) यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.