हाताला काम नसल्याने १५० कुटुंबांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:45 IST2019-01-16T00:44:20+5:302019-01-16T00:45:21+5:30
घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत.

हाताला काम नसल्याने १५० कुटुंबांचे स्थलांतर
लोकमत न्यूज नेटवर्क
राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. परिसरात रोजगार हमीची कामे उपलब्ध करून स्थलांतर थांबवावे, यावी अशी मागणी मजुरांमधून होत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात कामे राहिलेली नाही. जिरायत शेतीमधील पिकांची मागील महिन्यातच धूळधाण झाली. बागायती शेती विहिरीची पाणी पातळी एकदम कमी झाल्याने संकटामध्ये सापडली आहे. अशा परिस्थितीत मजुरांच्या हाताला शेतीशी निगडित असलेली कामे बंद पडली. काम उपलब्ध होत नसल्याने परिसरामधील जवळपास १५० कुटुंबे ऊस तोडणीसाठी तसेच शहराच्या ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतरित झाली असल्याचे समजले. परिसरात रोहयोची कामे सुरू नसल्याने रोजगारासाठी मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे.
महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमीची कामे मिळावी म्हणून गांवातील ३२० मजुरांनी कामाची मागणी केली आहे. परंतु निधीअभावी कामे करता येत नसल्याचे राणी उंचेगावचे सरपंच विठ्ठलराव खैरे यांनी सांगितले. या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे लक्ष घालण्याची मागणीही केली आहे.
राणी उंचेगाव कृषी मंडळामध्ये रोजगार हमीची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांच्या मागणीसाठी मजुरांना तालुका कृषी कार्यलयात, कृषीसहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकाºयांच्या संमतीसाठी चकरा माराव्या लागत आहेत. परंतु ही मंडळी अप-डाउन मध्ये व्यस्त असल्याने मजुरांची भेट होऊ शकत नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रशासन मजुरांच्या कामाबद्दल उदासीन धोरण राबवत असल्याने मजुरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.