ऐरवी ५ लाख, आता फक्त ५० हजार! राज्यातील मनरेगा कामांवरील मजूर संख्या का घटली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:04 IST2026-04-06T14:02:24+5:302026-04-06T14:04:03+5:30
हाताला काम मिळेना! 'एमएमएस' हजेरी आणि रोजंदारीच्या पेचामुळे मनरेगाचे मजूर संकटात;

ऐरवी ५ लाख, आता फक्त ५० हजार! राज्यातील मनरेगा कामांवरील मजूर संख्या का घटली?
- दीपक ढोले
जालना : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे हाताला काम मिळण्याची अपेक्षा असलेल्या मजुरांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. विविध मागण्यांसाठी काही ठिकाणी ग्रामरोजगार सेवकांचे सुरू असलेले काम बंद आंदोलन, वैयक्तिक कामांसाठी अनिवार्य केलेली एमएमएस हजेरी आणि आर्थिक वर्ष बदलाचा तांत्रिक फटका, यामुळे राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवरील मजुरांची संख्या लक्षणीय घटली आहे.
सध्या ३४ जिल्ह्यांतील २८,३०७ पैकी २,३३२ ग्रामपंचायतींमध्ये ८,५९१ कामांवर केवळ ४९,६७३ मजूर उपस्थित असून, चार जिल्ह्यांत तर एकही मजूर कामावर नसल्याची माहिती समोर आली. यात अकोला, हिंगोली, बुलडाणा आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. तांत्रिक अडचणींचा सर्वाधिक फटका या जिल्ह्यांना बसला असून, मजूर हक्काच्या कामापासून वंचित राहत आहेत. राज्यात ऐरवी ४ ते ५ लाख मजूर दररोज उपस्थित असतात. मात्र, सध्या यात मोठी घट झाली आहे.
मजूर घटण्याची प्रमुख कारणे
१. राज्य शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी रोजगार सहायकांना ८,००० रुपये मानधन आणि २,००० रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर केला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामरोजगारसेवकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
२. आता वैयक्तिक लाभाच्या कामांसाठीही 'एमएमएस'द्वारे हजेरी अनिवार्य केली आहे. त्याचे रजिस्ट्रेशन अद्याप पूर्ण झालेले नाही, परिणामी अनेक मजुरांची हजेरी लागणे कठीण झाले आहे.
३. मार्चअखेर आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातीमुळे मस्टर निघणे आणि देयके मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. मागील वर्षातील कामांचे पैसे पुढील वर्षात मिळणार असल्याने मजुरांत संभ्रमाचे वातावरण आहे.
जिल्ह्यांची मजूर उपस्थिती
अहिल्यानगर ८२३, अकोला ०, अमरावती ६९०७, बीड ११८९, भंडारा १२२१, बुलडाणा ०, चंद्रपूर २१२५, छत्रपती संभाजीनगर ३०१, धाराशिव १०४४, धुळे १०२५, गडचिरोली २३२१, गोंदिया २२३१, हिंगोली ०, जळगाव १३००, जालना २२६५, कोल्हापूर २५७, लातूर १४७३, नागपूर २३८०, नांदेड १०९४, नंदूरबार ४६७४, नाशिक १३६७, पालघर ७७९४, परभणी ०, पुणे १०९७, रायगड ११७, रत्नागिरी २५७५, सांगली ७५, सातारा २०७७, सिंधूदुर्ग ३६२, सोलापूर १३४, ठाणे ५९९, वर्धा ३८०, वाशिम १५१, तर यवतमाळ जिल्ह्यात केवळ ३१५ मजूर उपस्थित आहेत.
अनेक कारणे
सध्या वैयक्तिक कामांसाठी एमएमएस हजेरी लागू केली आहे. शिवाय, अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे मजुरांची संख्या घटली. याबाबत सोमवारी छत्रपती संभाजीनगरात आढावा बैठक होणार आहे.
-भरत गोगावले, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री.
२७ हजार ग्रामरोजगार सेवक संपावर
३ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील २७ हजार ग्रामरोजगार सेवक संपावर आहेत. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात.
-श्रावण बोकडे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना