मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:10 IST2025-04-30T11:52:56+5:302025-04-30T12:10:58+5:30
29 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत बेमुदत उपोषण – मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 28 ऑगस्टपर्यंत त्यांच्या 8 ते 9 प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास ते 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत. यासोबतच, अंतरवाली सराटीत चालू असलेले उपोषणही कायम राहणार आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हटले की, "मी मुंबईला जाताना विजयाचा आणि अंत्ययात्रेचा असे दोन रथ घेऊन जाणार आहे. हे केवळ आंदोलन नाही, तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे." जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली की, “मराठा आणि कुणबी एकच आहेत” असा आद्यादेश तातडीने काढावा. 58 लाख नोंदींचे पुरावे देऊनही आरक्षणाचा कायदा केला गेलेला नाही. मागील दोन वर्षांपासून संयम पाळला जात आहे. अनेक मागण्या प्रलंबित असून संबंधित अधिकाऱ्यांचा जातीय दृष्टिकोन आड येतोय, असा आरोप त्यांनी केला.
अशा आहेत प्रमुख मागण्या:
- मराठा-कुणबी एक असल्याचा आद्यादेश त्वरित काढावा
- 58 लाख नोंदींच्या आधारे तत्काळ प्रमाणपत्रे द्यावीत
- आंदोलकांवरील सर्व संबंधित केसेस मागे घ्याव्यात
- सगे सोयरे अंमलबजावणी करावी
- संस्थानांच्या (हैदराबाद, औंध, सातारा, मुंबई) गॅझेट्स लागू करावेत
- सर्व जाती-धर्मातील मुलींना मोफत शिक्षण मिळावे
आंदोलन शांततेतच होईल
“28 ऑगस्टनंतर जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर माझ्या मराठा बांधवांसोबत मी मुंबईत उतरणार आणि तेथे आमरण उपोषण करणार आहे. मात्र, आंदोलन शांततेतच होईल. कुणालाही धक्का लागू नये, ही माझी अपेक्षा आहे,” असे जरांगे यांनी शेवटी स्पष्ट केले.