अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत, शेकडो वाहनांच्या ताफ्यासह शक्ति प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:42 IST2024-06-25T17:42:39+5:302024-06-25T17:42:54+5:30
छत्रपती संभाजीनगरात १२ दिवस उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत, शेकडो वाहनांच्या ताफ्यासह शक्ति प्रदर्शन
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : सगेसोयरेच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या १० महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. १३ जून रोजी सगेसोयरे अंमलबजावणी बाबतचे बेमुदत उपोषण सरकारला एक महिन्याचा अवधी देऊन स्थगित करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. दरम्यान, १२ दिवसानंतर आज, दि. २५ मंगळवारी त्यांची रुग्णालयातून सुटी झाली. त्यानंतर अंतरवाली सराटीत शेकडो वाहनांच्या ताफ्यासह जरांगे दाखल झाले.
अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळ परिसरात गावकऱ्यांनी रांगोळी काढली होती. त्याच बरोबर गावात प्रवेश करताच महिलांनी जरांगे पाटील यांचे औक्षण केले. पुष्पवृष्टी करून जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल होऊन जरांगे पाटलांनी शक्तीप्रदर्शन केलं आहे.