- पवन पवार वडीगोद्री (जालना) : अंतरवाली सराटीहून मुंबईकडे हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील शेकडो वाहनासह निघाले असून महाकाळा अंकुशनगर येथे कुटुंबियांकडून मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करण्यात आले. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी मुलगा शिवराज यांनी त्यांना दोन कवड्याच्या माळ घातल्या आहे. या दरम्यान मुंबईला जाताना कुटुंबाला अश्रू अनावर झाले असून यावेळी जरांगे पाटील यांच्या डोळ्यात ही अश्रू तरारळे. त्यांनी मुलींची समजूत काढली. यावेळी पत्नी तीन मुली व मुलगा शिवराज हे उपस्थिती होते.
डोळ्यात लहान मुली महिला यांनी एकच घोष केला, सरका आम्हाला पाटलाला बघू द्या. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या एका मुलीचा अश्रू अनावर झाले. वडीगोद्री ते शहागड दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर मोठा जनसागर उसळला असून मनोज जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
महाकाळा अंकुशनगर येथे जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा बांधव,महिला, बच्चे कंपनी भर उन्हात चार तास जरांगे पाटील यांची वाट पाहत होते. अंतरवाली सराटीहून साडे दहा वाजता निघालेला मराठ्यांचा जनसागर साडे चार तासांनंतर महाकाळा अंकुशनगर येथे पोहचला अन् तेथून शहागड पैठण फाटा येथे रवाना झाला आहे. तेथील स्वागत झाल्यानंतर पैठण रोडमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे.