'तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:18 IST2025-02-09T16:17:36+5:302025-02-09T16:18:27+5:30
राज्यभरात वाळू माफियांविरोधात प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यात जरांगे पाटलांच्या मेहुण्याचाही समावेश आहे.

'तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
पवन पवार/ वडीगोद्री(जालना)- राज्यभरात वाळू माफियांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. काल जालना जिल्ह्यातील नऊ जणांविरोधात प्रशासनाने तडीपीरीची कारवाई केली, यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. या कारवाईनंतर जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. 'मला कितीही एकटा पाडायचा प्रयत्न करा, मी आता थांबत नसतो. मी आरक्षण मागतो, म्हणून माझे पाहुणेरावळे सापडतात का?' असा सवाल जरांगे पाटलांनी केला.
...तर तुमचा कार्यक्रम लावणार
का? अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'मी पाहुणारावळा मानत नाही, पूर्ण राज्य माझा पाहुणा आहे. मराठा आंदोलकांना नोटीसा द्यायच्या, पाहुणेरावळ्यांच्या नावाखाली माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी आरक्षण मागतो म्हणून माझे पाहुणेरावळे सापडतात का? फडणवीस साहेब, तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही,' असा घणाघात जरांगे पाटलांनी केला.
...तुमच्यावर गद्दारीचा शिक्का
जरांगे पाटील पुढे म्हणतात, प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही. मराठ्यांनी सांगावे आणि फडणवीसांनी करावे, अशी आमची भोळीभाबडी इच्छा होती. बेईमानी आणि गद्दारी या शब्दांचा शिक्का तुमच्यावर पडू देऊ नका. आम्ही भोळे लोक आहोत, त्यामुळे सढळ हाताने तुम्हाला मदत केली. तुम्ही रंडकुंडीला आला होता, ही गादी कधीच मिळू शकत नव्हती. या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुमचे भागले म्हणून तु्म्ही उलटणार असला, तर हे तुमच्यासाठी घातक ठरेल. चूक सुधाराा आणि दिलेल्या नोटीसा मागे घ्या. आम्ही तुम्हाला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा.'
देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र
'आपण स्पष्ट सांगितले आहे. तुमचे बाकीचे काय माहिती नाही, आपण त्यात पडतही नाही. पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीसा देणार असला, हे तुमच्यासाठी घातक आहे. बाकीचे तुमचे काही असेल तर मला देणेघेणे नाही. तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस दिल्यात हे ध्यानात ठेवा. सरकारने माझे तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचे नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीसला माहीत नाही की, मी समाजापुढे आई-बापाला सुद्धा जवळ केले नाही. महाराष्ट्रातील सहा कोटी मराठे माझे पाहुणे आहेत. आमच्या स्वभावाचा फायदा उचलायचा नाही. देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर मराठ्यांना त्रास दिला, तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही,' असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.