मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:36 IST2025-09-21T13:34:33+5:302025-09-21T13:36:09+5:30
Manoj Jarange Patil : बैठकीत अचानक मधमाश्यांचा हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
Manoj Jarange Patil :मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत आज (रविवार, दि. 21 सप्टेंबर) अचानक मधमाश्यांचा हल्ला झाल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे बैठक काही काळासाठी थांबवावी लागली. दरम्यान, मधमाश्यांनी हल्ला करताच समन्वयकांनी जरांगे पाटलांच्या अंगावर उपरणी टाकून सुरक्षित ठिकाणी नेले.
नेमकं काय घडलं?
मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची आज अंतरवालीतील सरपंच यांच्या शेतात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील आरक्षण चळवळीची पुढील दिशा आणि आगामी आंदोलनाची रणनीती यावर चर्चा करणार होते. सकाळपासूनच मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समन्वयक आणि गावोगावीचे प्रतिनिधी येथे जमले होते. मात्र, चर्चा सुरू होण्याआधीच अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्यामुळे परिस्थिती बिघडली.
क्षणार्धात मधमाश्यांनी उपस्थितांवर हल्ला चढवला. कार्यकर्त्यांनी बचावासाठी इकडे-तिकडे पळापळ सुरू केली. काहींनी झाडाझुडपांकडे धाव घेतली तर काहींनी अंगावर उपरणी, शाल किंवा टॉवेल टाकून अंग झाकण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात अनेकांना मधमाश्यांनी चावे घेतल्याची माहिती मिळत आहे.
मनोज जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाश्यांचा हल्ला...#manojjarangepatilpic.twitter.com/4JBYvau7mo
— Lokmat (@lokmat) September 21, 2025
जरांगे पाटलांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले
या गोंधलादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने समन्वयकांनी तातडीने त्यांच्या अंगावर उपरणे टाकून सुरक्षित ठिकाणी हलवले. काही काळानंतर परिस्थिती आटोक्यात आल्यावर पुन्हा एकदा बैठक सुरू करण्यात आली. सुदैवाने या गडबडीत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
या बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील मुद्द्यांविषयी माहिती दिली. आतापर्यंत ५८ लाख नोंदणी झाल्या आहेत, शासनाचा जीआरही निघाला आहे. अर्ज केव्हा दाखल करायचे, त्यावर कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोण सहभागी झाले?
या बैठकीसाठी मराठवाड्यातील ५० ते ६० तालुका सेवकांना बोलावण्यात आले. तसेच गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर नोंदी शोधणारे बांधव, प्रमाणपत्र काढून देणारे, दस्तऐवजांची मांडणी करणारे व मराठा समाजासाठी काम करणारे प्रमुख सेवक यांनाही सहभागी होण्यासाठी बोलावले.