हत्येच्या कटात बीडमधून दोघे ताब्यात; मनोज जरांगेंनी इशारा देत केला मोठा खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 19:13 IST2025-11-06T19:12:39+5:302025-11-06T19:13:34+5:30
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने रात्री उशिरा बीडमध्ये धडक देऊन दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले

हत्येच्या कटात बीडमधून दोघे ताब्यात; मनोज जरांगेंनी इशारा देत केला मोठा खुलासा...
जालना / वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट रचून अडीच कोटींची सुपारी दिल्याची तक्रार बुधवारी रात्री पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली. स्वत: जरांगे पाटील यांनीही बुधवारी मध्यरात्री पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन चर्चा केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने पावले उचलत गेवराईतून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट बीड जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीत रचण्यात आला होता. त्याच बैठकीत असलेल्या समर्थकाने जरांगे पाटील यांना ही बाब सांगितली. त्यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी रात्री पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार केली. जरांगे यांनीही पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. या तक्रारीनुसार पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले. त्यातील एक संशयित हा जरांगे पाटील यांचा जुनाच सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माझ्या खुनाचा कट रचला गेला हे सत्य आहे. कट शिजला गेला. यासंदर्भात पोलिस अधीक्षक स्वतः लक्ष घालून आहेत. तपासात दूध का दूध पाणी का पाणी होईल. हा हत्येचा कट आणि षडयंत्र एका मोठ्या व्यक्तीने रचले आहे, हे नाकारता येणार नाही. त्यासंदर्भातील पुरावे व रेकॉर्डिंग ऐकल्यानंतरच लक्षात येईल. यावर आपण शुक्रवारी सकाळी अधिक बोलू, असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा बांधवांनी शांत राहावं, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गांभीर्याने चौकशी सुरू
जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याबाबत जी तक्रार आली होती. त्या तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी सुरू असून, दाेन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आम्ही गांभीर्याने चौकशी करीत असून, चौकशीअंती अधिक माहिती दिली जाईल. जरांगे पाटील यांच्या सुरक्षेबाबतही पोलिस यंत्रणेने आवश्यक पावले उचलली आहेत.
- अजयकुमार बन्सल, पोलिस अधीक्षक, जालना