स्वत:च्या नावावर आलेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे शासनास केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:49 IST2024-12-11T17:40:00+5:302024-12-11T17:49:25+5:30
लवकरच होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी; पत्नीच्या आधार कार्डऐवजी पतीचे आधार कार्ड जोडले गेल्याचे झाले उघड

स्वत:च्या नावावर आलेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे शासनास केले परत
जालना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून रक्कम वसूल केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव सोमनाथ (ता. जालना) येथील एकाने स्वत:च्या नावावर आलेले ७,५०० रुपये मंगळवारी १० डिसेंबर रोजी परत केले.
जालना तालुक्यातील जळगाव सोमनाथ येथील विलास भुतेकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला होता. परंतु, त्यावेळी नजरचुकीने विलास भुतेकर यांचे आधारकार्ड अपलोड झाले होते. ५ डिसेंबर रोजी भुतेकर यांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ७,५०० रुपये जमा झाले होते. त्यांनी शहानिशा केल्यानंतर पत्नीच्या आधार कार्डऐवजी त्यांचे आधार कार्ड जोडले गेल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी मंगळवारी १० डिसेंबर रोजी जालना येथील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन योजनेचे पैसे परत करण्यासाठी असणारा अर्ज भरून दिला. त्यानंतर डीडीद्वारे ७,५०० रुपये शासनाकडे परत केले.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनी दिलेल्या अर्जांची पडताळणी होणार असून, अपात्र लाभार्थींची नावे वगळली जाण्याची चिन्हे आहेत. त्यात पुरुषांच्या नावावरही रक्कम गेल्याचे समोर आले आहे, अशा रकमाही शासनाकडून वसूल केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.