Maharashtra Election 2019 : ‘शिवसैनिकांसमोर गुडघेच काय, मस्तकही टेकविणार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 02:00 IST2019-10-11T02:00:24+5:302019-10-11T02:00:44+5:30
मराठवाड्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ औरंगाबाद, वैजापूर, कन्नड आणि घनसावंगी येथे गुरुवारी त्यांच्या सभा झाल्या.

Maharashtra Election 2019 : ‘शिवसैनिकांसमोर गुडघेच काय, मस्तकही टेकविणार’
घनसावंगी (जि. जालना) : कन्नड/वैजापूर (जि, औरंगाबाद) : शिवसेनेची खरी ताकद ही शिवसैनिक आहेत. भाजपसोबत युती करताना आमच्यावर काहींनी टीका केली. परंतु, त्याकडे लक्ष देत नाही. शिवसैनिकांसाठी गुडघेच काय, परंतु, मस्तकही टेकविण्यास मागे पाहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घनसावंगी येथील प्रचार सभेत केले.
मराठवाड्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ औरंगाबाद, वैजापूर, कन्नड आणि घनसावंगी येथे गुरुवारी त्यांच्या सभा झाल्या. मराठवाड्यातील पहिली सभा गुरूवारी ठाकरे यांनी घनसावंगीत शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारानिमित्त घेतली. त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवारांसह आघाडीतील अन्य नेते गैरव्यवहाराच्या माध्यमातून खाऊन खाऊन थकले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसून पवार मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाल्याचा इतिहास आहे. तशी खंजीर खुपसण्याची वृत्ती आमची नाही,अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर वैजापूर येथे प्रा. रमेश बोरनारे यांच्या प्रचार सभेत टीका केली. ते म्हणाले, संपूर्ण राज्यात भगवे वातावरण असून राज्यात युतीची सत्ता येणारच. शिवसेनेचे हिंदुत्व हे व्यापक आहे. ते जातीशी निगडित नसून, इथला मुस्लिमही सच्चा शिवसैनिक आहे; पण येथे राहून पाकचे गुणगान गाणारा मुस्लीम कधी शिवसैनिक होऊ शकत नाही. शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा उचलून धरला तो हिंदुत्वातूनच, असे ठाकरे म्हणाले.