कुटुंबाचा आधार हरपला; ट्रॅक्टरच्या अपघातात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 16:22 IST2021-05-14T16:21:42+5:302021-05-14T16:22:55+5:30
विहिरीच्या डबराची वाहतूक करीत असताना चढ आल्याने ट्रॅक्टर उलटला.

कुटुंबाचा आधार हरपला; ट्रॅक्टरच्या अपघातात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथे ट्रॅक्टर उलटल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. काकासाहेब लिंबाजी ठोंबरे (३०) असे मृताचे नाव आहे.
काकासाहेब हे बुधवारी ट्रॅक्टरमधून विहिरीच्या डबराची वाहतूक करीत होते. चढ आल्याने ट्रॅक्टर उलटला. या अपघातात काकासाहेब यांच्या मेंदूला जबर मारला लागला. त्यांना तत्काळ जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मार जास्त असल्याने त्यांना औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी काकासाहेब यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी जवखेडा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
कुटुंबाचा आधार हरपला
आई-वडिलांना काकासाहेब हा एकुलता एक मुलगा होता. आई-वडील अत्यंत भोळ्या स्वभावाचे असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून कष्टाने काकासाहेबांनी गावात नावलौकिक मिळविले होते. त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.