दरोडेखोरांचा म्होरक्या राजकीय कार्यकर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:40 IST2018-03-26T00:40:14+5:302018-03-26T00:40:14+5:30
औद्योगिक वसाहतीमधील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या टोळीचा म्होरक्या मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा मुंब्रा भागातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता आहे.

दरोडेखोरांचा म्होरक्या राजकीय कार्यकर्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या टोळीचा म्होरक्या मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा मुंब्रा भागातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता आहे. ट्रॉन्सपोर्टचे काम करताना कुठला माल कुठे जातो याची माहिती घेऊन परिसराची रेकी करून चोरी करण्याची या टोळीची कार्यपद्धती आहे.
मुंबईतील मुंब्रा भागात तीन ते चार गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीचा मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा म्होरक्या असून, त्याचा मुंब्य्रातील राजकीय वर्तुळात वावर आहे. ट्रॉन्सपोर्ट व्यवसायाशी निगडित कामामुळे कुठला माल कोणत्या भागात जाणार याचीही माहिती त्याला अनेकदा मिळत असे. चोरी झालेल्या कंपन्यांमध्ये ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी लागणारे महागडी कॉपर तार, पितळ व अन्य साहित्य असल्याची माहिती मोहंमद इम्रान याला मिळाली होती. त्याने जमीरउल्ला अन्सारी, अब्दुल सईम महंमद युनूस, असलम अली अक्रम अली, अब्दुल सलीम खान, अकबर अबीद खान (४५, इरशाम अहमेद खान व अन्य दोघांना सोबत घेतले. ‘माल उठाने के लिये जाना है’ एवढीच माहिती त्याने टोळीत साथीदारांना दिली होती.
शिला व पंकज या कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण केल्यानंतर यातील दोघांना खरा प्रकार कळला. मुद्देमाल ट्रकमध्ये घेऊन मुंबईकडे जाताना चोरट्यांनी चोरलेली दुचाकी औरंगाबाद-शिर्डी रस्त्यालगत फेकून दिली. घटनेतील ट्रकचा क्रमांक मिळालेला असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने त्या दिशेने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी मुंबईत एटीएसमध्ये काम केलेले असल्यामुळे त्या भागातील खब-यांकडून माहिती मिळवली.
या घटनेतील संशयित मुंब्रा भागातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस व खब-यांच्या मदतीने जालना पोलिसांनी त्यातील एकाला पकडले. त्याने अन्य तिघांची नावे सांगितली. सर्वजण एकाच भागात राहत असल्याने पोलिसांनी दोन दिवसात वरील सात जणांना ताब्यात घेतले. अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
चोरलेला मुद्देमाल मुंबईत विक्री करण्याचा दरोडेखोरांचा प्लॅन होता. विक्री करण्यापूर्वी चोरट्यांनी मुद्देमालाचे एका ठिकाणी वजन केले. या वजनाची पावती जालना पोलिसांच्या खब-याने पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना व्हॉसअॅपवर पाठवली. पोलीस शोधत असलेला ट्रक व या ट्रकचा क्रमांक एकच असल्याने पोलीस तपास करत ट्रक मालकापर्यंत पोहचले. चौकशीत टोळीतील एकाचे नावाची माहिती मिळाली. हाच धागा पकडून पोलिसांनी सात दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
सराईत गुन्हेगार
दरोडेखोरांच्या या टोळीत आणखी काही जणांचा सहभाग आहे. त्यांनी या पूर्वी महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश व गुजरातमध्ये चोरी व दरोड्याचे गुन्हे केले आहेत. टोळीचे सदस्य पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.