खोतकर म्हणजे जालन्याचे लालूप्रसाद - दानवेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 11:52 IST2018-06-08T11:52:48+5:302018-06-08T11:52:48+5:30
शिसवेसेना मंत्री अर्जुन खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद आहेत, अशी टीका करत रावसाहेब दानवें यांनी पलटवार केला आहे.

खोतकर म्हणजे जालन्याचे लालूप्रसाद - दानवेंचा पलटवार
मुंबई : शिसवेसेना मंत्री अर्जुन खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद आहेत, अशी टीका करत रावसाहेब दानवें यांनी पलटवार केला आहे. जालन्यातील विकासकामावरुन दानवे-खोतकर यांच्यामध्ये मागिल काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना खोतकर यांनी दानवे यांना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे, असा घणाघात केला होता. दानवे यांनी यावर खोतकर यांचा खरपूस समाचार घेत प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमधील काही लोकांसोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. लवकरच खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करतील हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असा गौप्यस्फोट यावेळी दानवे यांनी केला आहे. खोतकरांच्या या हालचालीबाबत 'मातोश्री'वरही माहिती आहे. माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप करणारे खोतकर स्वतःच शिवसेना संपवायला निघाले आहेत. असेही यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आत्मविश्वासाने सांगितले. पुढे अर्जुन खोतकरांचं 'मातोश्री'वर इतकंही वजन नाही, की ते मला बंदी घालू शकतील. उलट त्यांनाच मातोश्रीवर भेटीसाठी तीन-चार तास वाट बघावी लागते, असा दावाही दानवेंनी केला.
काय म्हणाले होते खोतकर -
- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे.
- दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे.
- रावसाहेब दानवेंचा जालन्यातील सरकारी आधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून सर्वच आधिकाऱी त्यांच्या दहशतीखाली आहेत.
- दानवे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तासनतास आपल्या कक्षाबाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवत.
- भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान रावसाहेब दानवे यांना डावलण्यात खुद भाजपाच्या नेत्यांचाच हात होता.
- दानवे शिवसेना संपवायला निघाले.