कैलास बोराडे मारहाण प्रकरण, वंचितचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 19:23 IST2025-03-06T19:22:45+5:302025-03-06T19:23:07+5:30
पीडित कैलास बोराडे यांच्या पत्नीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते व ओबीसी समाजाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते.

कैलास बोराडे मारहाण प्रकरण, वंचितचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जालना : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील कैलास बोराडे मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करून त्यांना मोक्का लावावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरूवारी ६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पीडित कैलास बोराडे यांच्या पत्नीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते व ओबीसी समाजाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते.
शहरातील गांधी चमन येथून गुरूवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे मुख्य संघटक महेश निनाळे, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, जिल्हा महासचिव प्रशांत कसबे, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे, दीपक बोराडे, रामप्रसाद थोरात, स्नेहा सोनकाटे, प्रभाकर बकले, वंचितच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रमा होर्शिल आदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पीडित कैलास बोराडे यांच्या पत्नी सुरेखा बोराडे व त्यांचा परिवार ही सहभागी झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाले. यावेळी नवनाथ वाघमारे, दीपक बोऱ्हाडे, जितेंद्र शिरसाट, रामप्रसाद थोरात, डेव्हिड घुमारे यांनी कैलास बोराडे मारहाण प्रकरण हे माणुसकीला काळिमा फासणारे असून महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असल्याचे हे द्योतक असल्याचे सांगितले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जालना तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष सुंदरलाल बगीनवाल, सचिव राजेंद्र वांजुळे, ज्ञानेश्वर मानवतकर, दीपक खाजेकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तर तीव्र आंदोलन करू : घुमारे
महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कैलास बोराडे मारहाण प्रकरणाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रथम वाचा फोडली. आज वंचित बहुजन आघाडीने कैलास बोराडे मारहाण प्रकरणी काढलेला जालना शहरातील मोर्चा हा महाराष्ट्रातील पहिला मोर्चा आहे. केवळ मागासवर्गीय, भटका विमुक्त समाजाच नव्हे तर ओबीसींच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी भक्कमपणे उभी राहिली आहे, हे या प्रकरणावरून स्पष्ट होते. कैलास बोराडे मारहाण प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्याची मागणी केली आहे. ती मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिला.