मराठा समाज सहन करतो म्हणून त्यांची तुम्ही परीक्षा बघावी, असा अर्थ होत नाही: उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 17:49 IST2023-09-02T17:45:47+5:302023-09-02T17:49:07+5:30
लाठीचार्जबाबत न्यायालयीन चौकशी सुरू करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली

मराठा समाज सहन करतो म्हणून त्यांची तुम्ही परीक्षा बघावी, असा अर्थ होत नाही: उदयनराजे
जालना: मराठा समाजाने ५७ मोर्चे काढले. पण, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा बघाल, असा अर्थ होत नाही. सर्व पक्षांनी विशिष्ट समाजाला घेऊन राजकारण केलं. मात्र, राज्यातील सर्वांत मोठ्या मराठा समाजाकडं दुर्लक्ष केलं, अशी खंत उदयनराजे यांनी अंतरवाली सराटी येथे व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना पोलीसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी आंदोलकांची त्यांनी आज दुपारी भेट घेतली.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. दरम्यान, आज दुपारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित होते. अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठा समाजाला का मिळत नाही? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. तसेच आंदोलक आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची लवकरच भेट घडवून आणू, असे आश्वासन त्यांनी दिले. उदयनराजे म्हणाले,लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. जखमी रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावे. लाठीचार्जबाबत न्यायालयीन चौकशी सुरू करावी. अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठा समाजाला न्याय का मिळत नाही? शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावं, असे आवाहनही त्यांनी केले.
गायकवाड कमिशनमध्ये केलेला रिपोर्ट हायकोर्टात टिकला पण वरच्या न्यायालयात नाही टिकला. यात थोड्याफार त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वांनी करावं. मी सर्वांना आवाहन करतो. आपल्याला शांततेन आंदोलन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पाईक आहोत. सर्वधर्म मराठा समाजाला न्याय मिळत नसेल, तर यापेक्षा दुर्दैवी बाब नाही, असं उदयनराजे म्हणाले. लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा निषेध करतो. याची चौकशी करून सर्वांना न्याय मिळाला. या प्रकरणी आंदोलकांवरी गुन्हे मागे घेण्याचे आवाहन करतो, याचा निश्चितपणे पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर उदयनराजे यांनी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन जखमी आंदोलकांची विचारपूस केली.