जालना हादरले! अचानक दोघे समोर आल्याने अनियंत्रित कार विहिरीत कोसळली,पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:20 IST2025-08-29T10:17:40+5:302025-08-29T10:20:57+5:30

अपघातापूर्वी कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांना धडक दिली, ज्यात एक गंभीर जखमी आहे.

Jalna shaken! Four people died in a car that fell into a well in a horrific accident | जालना हादरले! अचानक दोघे समोर आल्याने अनियंत्रित कार विहिरीत कोसळली,पाच जणांचा मृत्यू

जालना हादरले! अचानक दोघे समोर आल्याने अनियंत्रित कार विहिरीत कोसळली,पाच जणांचा मृत्यू

जालना : अचानक समोर आलेले युवक वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार विहिरीत कोसळून पाचजणांचा मृत्यू झाला. याच कारने धडक दिल्याने एक इसमही गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास टेंभुर्णी-राजूर मार्गावरील गाढेगव्हाण पाटीजवळ घडली. घटनेनंतर ७० फूट खोल आणि पाण्याने भरलेल्या विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनास तब्बल सात तास लागले. 

ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे (५५), पद्माबाई लक्ष्मण भांबिरे (५५), अजिनाथ तुळशिराम भांबिरे (४०, तिघेही रा. कोपर्डा, ता. भोकरदन), निर्मला सोपान डकले (२५), ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले (४०, दोघही राहणार गेवराई गुंगी, ता. फुलंब्री) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

उपचारासाठी जाताना झाला अपघात
निर्मला डकले यांना अर्धांगवायू असल्याने त्यांना घेऊन त्यांची आई पद्माबाई भांबिरे, दीर ज्ञानेश्वर डकले हे तिघे शुक्रवारी पहाटे सुलतानपूरकडे निघाले होते. निर्मला यांनी भाऊ ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे यास संपर्क करून येण्यास सांगितले. ज्ञानेश्वर यांनी चुलतभाऊ आजिनाथ भांबिरे यांना सोबत घेऊन दुचाकीवरून हसनाबाद फाटा गाठला. तेथे त्यांनी दुचाकी लावून गेवराई गंगीहून आलेल्या कारमध्ये (क्र. एमएच २० ईई ८३३२) बसले. सर्वजण सुलतानपूरकडे निघाले. परंतु, गाढेगव्हाण पाटीजवळ मॉर्निंग वॉक करणारे दोघे कारसमोर आले आणि त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न केला असता, चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट विहिरीत कोसळली. कारच्या धडकेत भगवान साळुबा बनकर (५५, रा. गाढेगव्हाण) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निर्मला डकले यांचे पती मराठा आंदोलनात सहभागी
निर्मला डकले यांचे पती सोपान डकले मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला गेलेले आहेत. त्यामुळे निर्मला यांना सुलतानपूर येथे घेऊन जाण्यासाठी त्यांनी दीर ज्ञानेश्वर डकले यांना छत्रपती संभाजीनगरहून बोलावले होते. या अपघातानंतर घटनेची माहिती त्यांना दिल्यानंतर ते परत येत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य
सुमारे ७० फूट खोल आणि पाण्याने भरलेल्या विहिरीत माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित यांच्यासह इतरांनी मदतीसाठी उड्या मारून अडकलेल्या कारमधील मृतदेह एकेक करून दोरीच्या साहाय्याने वर बांधून दिले. त्यानंतर विहिरीच्या कठड्यावर उपस्थित स्थानिकांनी ते मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर सर्व मृतदेह टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

पैठण येथील रेस्क्यू टीम पाचारण
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या बंबामधील फक्त एकच कर्मचारी पाण्यात उतरून कारचा शोध घेऊ लागला. मात्र, पाण्याची खोली अधिक असल्यामुळे यश मिळाले नाही. त्यानंतर प्रशासनाने पैठण येथील खासगी रेस्क्यू तज्ज्ञ अर्जुन घायाळ व एकनाथ वाघ यांना पाचारण केले. त्यांनी ऑक्सिजन सिलिंडर लावून पाण्यात उड्या घेतल्या. त्यानंतर सुमारे पाच तासांनंतर विहिरीत अडकलेल्या कारसह पाचही मृतदेह शोधून काढले. मृतदेह काढल्यानंतर शेवटी क्रेनच्या साह्याने कारही बाहेर काढण्यात आली.

Web Title: Jalna shaken! Four people died in a car that fell into a well in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.