विजय मुंडे/ जालना : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून महायुतीत १९ जागांची मागणी करण्यात आली होती. परंतु, चर्चेनंतर सन्मानजनक ८ जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. परंतु, मागणीनुसार अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी रात्री प्रसिद्धीपत्रक जारी करून स्वबळाचा नारा देण्यात आला. दुसरीकडे भाजप-शिंदेसेनेत १६ पैकी १२ प्रभागांतील जागा वाटपांवर एकमत झाले असून, इतर प्रभागातील जागांसाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरूच होती.
भाजप-शिंदेसेनेत एकमत
महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात जागा वाटपावरून महायुतीतील मित्रपक्षांत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये सोमवारी झालेल्या बैठकांमध्ये १२ प्रभागांतील जागा वाटपावर एकमत झाल्याचे वृत्त आहे. उर्वरित चार प्रभागांतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यात मित्रपक्षांना जागा दिल्या जाणार आहेत. परंतु, राष्ट्रवादीला (अजित पवार) महायुतीत मागणीनुसार जागा मिळत नसल्याने जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.
जागासंदर्भात स्पष्टता न आल्याने स्वबळाचा निर्णय
वाट्याला येणाऱ्या जागेच्या संदर्भात कोणतीही स्पष्टता समोरून न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर आर्दड, जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद म्हणाले. इच्छुकांना मंगळवारी सकाळी ९ वाजता पक्ष कार्यालयात बोलाविले आहे.
आजवर ३०० अर्ज दाखल
महानगरपालिका निवडणुकीसाठी आजवर ३ हजार २३ अर्जाची विक्री झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच पाचही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत उमेदवारांनी रांगा लावल्या होत्या. सोमवारी एकाच दिवशी शहरातील १६ प्रभागांतून एकूण २५२ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली. यासह आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण अर्जाची संख्या ३०० वर पोहोचली आहे.
युती नको, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
एकीकडे भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर बैठकांवर बैठका सुरू आहेत. त्यात दुसरीकडे सोमवारी सकाळी भाजपच्या शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी युती नको असे म्हणत भास्कर दानवे यांच्याकडे स्वबळावर लढण्याची मागणी केली. दानवे यांनी त्यांची समजूत काढत वरिष्ठांना मागणी कळवित असल्याचे सांगितले.
भोकरदन शहरात रात्री उशिरापर्यंत बैठकीत चर्चा
जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेत १२ प्रभागांतील जागा वाटपांवर एकमत झाले आहे. उर्वरित प्रभागातील जागा वाटप आणि मित्रपक्षाला द्यावयाच्या जागा यावर भोकरदन येथे रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिंदेसेनेचे उपनेते आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह काह प्रमुख पदाधिकारी बैठकीत सहभागी होते.
मविआत चर्चेचे गुन्हाळ
महाविकास आघाडीकडून मित्रपक्षांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. परंतु, असे असले तरी जागा वाटप जाहीन करण्यात आलेले नाही. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असून, महाविकास आघाडीकडून होणाऱ्या घोषणेकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : NCP declares independent bid for Jalna elections after seat-sharing disagreements. Shinde Sena-BJP agree on 12 wards, discussions continue. Other BJP officials want to contest independently.
Web Summary : जालना चुनाव के लिए NCP ने स्वतंत्र रूप से लड़ने की घोषणा की। शिंदे सेना-भाजपा 12 वार्डों पर सहमत, चर्चा जारी। अन्य भाजपा अधिकारी स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने की मांग कर रहे हैं।