जालना जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:54 IST2019-09-01T00:54:17+5:302019-09-01T00:54:43+5:30
गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

जालना जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन..!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे जनावरांचा पाणीप्रश्नही मार्गी लागला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान अद्यापही कायम आहे.
जिल्ह्यात ज्या गावांमध्ये दमदार पाऊस झाला आहे त्यात प्रामुख्याने जालना तालुक्यातील रामनगर (६०), पाचन वडगाव (७०), बदनापूर तालुक्यातील दाभाडी (६५), सेलगाव (६५), भोकरदन (७७), राजूर (७९), परतूर (६३) आणि घनसावंगी महसूल मंडळात (६२) पाऊस झाला. कंसातील आकडे हे मिलीमीटरमध्ये पाऊस दर्शवितात. जिल्ह्यात एकूण ३२.५९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. आजवर एकूण ३२१.२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस पाहता जालना तालुक्यात ४० मिमी पाऊस झाला आहे. तर बदनापूर- ४५.२० ४० मिमी, भोकरदन- ३७.३८ मिमी, जाफ्राबाद १९.२० मिमी, परतूर- २५.१६ मिमी, मंठा- १८.७५ मिमी, अंबड- ४० मिमी, घनसावंगी तालुक्यात ३५. मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
दिलासा...
भोकरदन, परतूर, बदनापूर, अंबडसह कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी, देवी दहेगाव, भामनगाव, मूर्ती, लिंबी, जांब समर्थ, राजूर, हसनाबाद, पारधसह परिसरात दमदार पाऊस झाला. पावसामुळे या भागातील खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून, सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.