Jalana: 'समाज काय म्हणेल?' चार दिवसांपासून बेपत्ता विवाहित महिला, तरुणाने संपवले जीवन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:58 IST2025-11-10T12:55:16+5:302025-11-10T12:58:06+5:30
समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Jalana: 'समाज काय म्हणेल?' चार दिवसांपासून बेपत्ता विवाहित महिला, तरुणाने संपवले जीवन!
भोकरदन / धावडा (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेली महिला व तरुणाने रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाढोणा शिवारातील कालिंका माता डोंगर पर्वतरांगेत एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
महिलेचे नाव जयाबाई पांडुरंग गवळी (वय ३८ वर्षे, रा. वालसांवगी) असून गणेश उत्तम वाघ (वय २४, रा. वालसांवगी) असे अविवाहित तरुणाचे नाव आहे. दोघांचेही मृतदेह सागाच्या झाडाला पांढऱ्या दोरखंडाचा आणि लांब रुमाल वापर करून लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. जयाबाई गवळी या विवाहित असून, त्यांना दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे. तर, गणेश वाघ हा अविवाहित असून त्यांचा विवाह जुळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. दोघांनी ६ नोव्हेंबर रोजी वालसावंगीतून घर सोडले होते. तीन दिवस बाहेर राहिल्यानंतर ‘आता घरी परत गेल्यावर समाजात आपली बदनामी होईल’ या भीतीने त्रस्त होऊन या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला, असे सपोनि. संतोष माने यांनी सांगितले.
सपोनि. संतोष माने यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने, सुभाष जायभाये, सुरेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताचे नातेवाईक दीपक गवळी यांच्या फिर्यादीवरून पारध ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास बिट जमादार जायभाये करत आहेत.