Jalana: वाळूच्या ढिगाऱ्यावरून वाद, पोलिस ठाण्याबाहेरील मारहाणीत जखमी तक्रारदाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:38 IST2025-06-11T12:37:46+5:302025-06-11T12:38:24+5:30
जाफराबाद ठाण्यासमोरील घटना : या प्रकरणात दोन सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalana: वाळूच्या ढिगाऱ्यावरून वाद, पोलिस ठाण्याबाहेरील मारहाणीत जखमी तक्रारदाराचा मृत्यू
जालना : घराशेजारी पडलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावरून झालेल्या मारहाणीतील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जाफराबाद पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर सोमवारी रात्री घडली. युवकाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी पोलिस व संशयितांवर आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकरणात दोन सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमेश्वर बाबुराव सोनुने (वय-३५ रा. सावरखेडा) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणात दीपक बाबुराव सोनुने यांनी फिर्याद दिली आहे. सोनुने यांच्या घराच्या पाठीमागे सुखदेव सोनुने यांची बांधकामासाठी आणलेली वाळू पडलेली आहे. येण्या-जाण्यास त्रास होत असल्याने दीपक व त्यांची आई हे सोमवारी रात्री सांगण्यास गेल्या असता. राजू सुखदेव सोनुने, विजू सुखदेव सोनुने यांनी शिवीगाळ करून वाद केला. त्यानंतर दीपक हे जाफराबादेत तक्रार देण्यासाठी आले. दोन्हीकडील मंडळी आल्याने पोलिसांनी सर्वांनाच ठाण्याच्या बाहेर काढले. त्यावेळी राजू सोनुने, विजू सोनुने यांनी परमेश्वर सोनुने यांच्या डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केले. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत जखमीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून जालना येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना परमेश्वर सोनुने यांचा मृत्यू झाला.
नातेवाईकांचा आक्रोश
युवकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. जाफराबाद ठाण्यात जमा झालेल्या नातेवाईकांनी कारवाई होईपर्यंत मृतदेह हाती घेणार नाही. पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीची चौकशी करून कारवाई करावी यासह इतर मागण्या लावून धरल्या. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे खंडण करीत सीसीटीव्हीत अशी कोणतीच घटना दिसत नसल्याचे सांगितले. या प्रकरणात आरोपींना अटक केल्याचेही सांगण्यात आले.
जुळ्या मुलांचे छत्र हरवले
सोनुने यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. परमेश्वर यास दोन जुळे अपत्य असून, एक मुलगा, एक मुलगी आहे. दोन्ही वयाने ३ वर्षाचे असून, या चिमुकल्यांच्या डोक्यावरील वडिलांच्या मायेचे छत्र हरवले आहे.