भोकरदन (जालना): शहरात आणि ग्रामीण भागात मारामाऱ्या व गुन्हेगारीच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या किरण कैलास पंडित (रा. मेरखेडा) याच्याविरुद्ध प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. उपविभागीय दंडाधिकारी बी. सरवनन यांनी किरण पंडित याला जालना आणि लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश सोमवारी जारी केले.
दहशतीमुळे नागरिक होते धास्तावलेलेकिरण पंडित हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असून त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता धोक्यात आली होती. पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाब समोर आली की, याच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक उघडपणे साक्ष द्यायलाही घाबरत होते. यापूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांचा त्याच्यावर कोणताही परिणाम न झाल्याने अखेर हद्दपारीचे अस्त्र उगारण्यात आले आहे.
४८ तासांत सीमा सोडण्याचे आदेशमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आदेशानुसार किरण पंडितला पुढील ४८ तासांत जालना आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमा सोडाव्या लागणार आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाच जण पोलिसांच्या 'हिटलिस्ट'वर!किरण पंडितवरील कारवाई ही केवळ सुरुवात मानली जात आहे. अवैध वाळू माफिया आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणखी ५ ते ६ जण सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्यावरही हद्दपारी किंवा एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
Web Summary : Kiran Pandit, a terror in Bhokardan, Jalna, is exiled for six months from Jalna and Buldhana due to his criminal activities. Police action follows rising public fear and previous ineffective preventative measures. More criminals are under police radar for similar actions.
Web Summary : जालना के भोकरदन में दहशत फैलाने वाले किरण पंडित को आपराधिक गतिविधियों के चलते जालना और बुलढाणा से छह महीने के लिए निष्कासित कर दिया गया है। पुलिस कार्रवाई सार्वजनिक भय और पिछली अप्रभावी निवारक उपायों के बाद हुई। अधिक अपराधी पुलिस रडार पर हैं।