Jalana: गळ्यात फास अडकवून पिंपळावर चढला युवक; अनोख्या आंदोलनाने एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:29 IST2025-06-09T18:28:18+5:302025-06-09T18:29:17+5:30
भोकरदन पंचायत समितीच्या आवारात युवकाचे लक्षवेधी आंदोलन

Jalana: गळ्यात फास अडकवून पिंपळावर चढला युवक; अनोख्या आंदोलनाने एकच खळबळ
भोकरदन ( जालना) : तालुक्यातील करजगाव ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी आनंद पंडितराव कानडे या तरुणाने का भोकरदन पंचायत समितीच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून गळ्यात फास घालून आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
पंचायत समिती कार्यालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर आनंद कानडे या तरुणाने आज सकाळी गळ्यात फास अडकवून आंदोलन सुरू केले. करजगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतचा निधी एका सेवाभावी संस्था यांचे नावे टाकून काढून घेतला, वैयक्तिक लाभाच्या कामात आणि वित्त आयोगाच्या कामात गैरव्यवहार केला आहे, याची चौकशी करावी यासाठी कानडे याने अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलने केली. मात्र, अद्याप प्रशासनाने यावर कसलीही कारवाई केली नाही, काही अधिकारीच त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप कानडे यांनी केला आहे. गटविकास अधिकारी देखील कोणतीच कारवाई करीत नाहीत, असे म्हणत कानडे यांनी पिंपळ झाडावर चढून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कारवाईचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, गरज पडल्यास जीवन संपवू असे म्हणत गळ्यात फास लटकावून कानडे यांनी आंदोलन सुरू केले आहे.
माहिती मिळताच भोकरदन ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे, पवन राजपूत, गवळी व चार कर्मचारी आंदोलनस्थळी आले. त्यांनी कानडे यांना खाली उतरण्याची विनंती केली. मात्र ३ वाजेपर्यंत तरी कानडे यांना खाली उतरले नव्हते. दरम्यान, गटविकास अधिकारी यांच्यासह जबाबदार कर्मचारी कार्यालयातून गायब झाले होते.