सगळ्या गावांना दिले, मग आम्हालाच का वगळलं; अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचा सवाल
By महेश गायकवाड | Updated: April 3, 2023 17:04 IST2023-04-03T17:04:32+5:302023-04-03T17:04:58+5:30
खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते.

सगळ्या गावांना दिले, मग आम्हालाच का वगळलं; अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचा सवाल
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या महसूल मंडळातील २२ गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले. शेतीपिकांचे नुकसान होऊनही सरकार करत असलेल्या अन्यायाच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आपल्या व्यथा मांडल्या. येणाऱ्या सात दिवसांच्या आत अनुदानाच्या यादीत आमचा समावेश करा, नसता आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिला.
खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते. वरुड बुद्रुक मंडळात पडलेल्या पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रात चुकीची झाल्याने या महसूल मंडळातील ९ हजार ७८५ बाधित शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे राजकीय हेतू बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर नुकसानभरपाईसाठी मोर्चा काढला. शासनाने अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. या यादीत तालुक्यातील पाच मंडळांपैकी वरुड बुद्रुकचा समावेश करण्यात आला नाही. पर्जन्यमापक यंत्रातील आकडेवारीवरून शासनाने या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळले. दुसऱ्या मंडळातील शेतकऱ्यांची जमीन वरुड मंडळात असताना त्यांना अनुदान मिळत आहे; मात्र या मंडळातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. ही शासनाच्या यंत्रातील चुकीचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला आहे.
वरुड बुद्रुक मंडळातील अनेक गावे ही डोंगराळ भागाला जोडून असल्याने सततच्या अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेली होती. शेतात पाणी साचल्याने शेतातील पिके सडून गेली होती. ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अतिवृष्टीची नाेंद होते. प्रत्यक्षात पीक पाण्याखाली तरी यंत्रात नोंद होत असेल तर त्याच्यात आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी माजी सभापती रमेश गव्हाड, मयूर बोर्डे, गजानन लोखंडे, एल. बी. शिंदे, मंगेश गव्हाड, राजेंद्र सोनवणे, गजानन शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.