Investigation of wells; Even with a grant | विहिरींची चौकशी; अनुदानावरूनही खडाजंगी
विहिरींची चौकशी; अनुदानावरूनही खडाजंगी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रोजगार हमी योजनेतून दुष्काळावर मात करण्यासाठी जवळपास ५९५ विहिरींना मंजुरी मिळाली होती. परंतु यापैकी २५२ विहिरींना सभागृहाची मान्यता न घेता एकाच दिवशी मान्यता आणि एकाच दिवशी तांत्रिक मान्यता देण्यात आली. तरी या २५२ विहिरींपैकी केवळ एका विहिरीचे काम पूर्ण झाले. कृषी विभागाकडून रोटावेटरचे अनुदान रखडणे, कंत्राटदारांकडून दर्जेदार काम न होणे यासह अन्य मुद्यांवरून बुधवारी जिल्हा परिषदेची स्थायी सभा गाजली.
अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सतीश टोपे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजपचे सदस्य शालिकराम म्हस्के यांनी विहिरींसह अनेक मुद्दे उपस्थित करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुष्काळ निवारण करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून जालना जिल्ह्यात जवळपास ५९५ विहिरींना मान्यता मिळाली होती. असे असतांना त्या पैकी २५२ विहिरींच्या कामांना छाननी समितीची मंजूरी मिळाल्याचे उत्तर सभागृहात दिले. मात्र, या उत्तरामुळे म्हस्के यांचे समाधान झाले नाही.
सार्वजनिक विहिरींचे प्रस्ताव कोणत्या तारखेत प्राप्त झाले होते आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने या प्रस्तावांना कोणत्या तारखेत मंजूरी दिली? ही माहिती सभागृहात सादर करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी मग्रारोहयो कक्षातर्फे कराड यांनी प्राप्त प्रस्तावांच्या तारखा आणि छाननी समितीच्या मंजूरीच्या तारखा सभागृहात वाचून दाखविल्यानंतर म्हस्के यांनी पुन्हा आक्रमक भूमिका या दोन्ही प्रक्रिया एकाच तारखेत कशा होऊ शकतात, असा सवाल उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी केली.
याचवेळी बप्पासाहेब गोल्डे यांनी कृषी विभागातर्फे ज्या शेतक-यांना रोटावेटर ट्रॅक्टर, कडबा कुट्टी इत्यादी साहित्याचा लाभ देण्यात आला. अशा शेतकºयांना गेल्या दीड वषार्पासून अनुदान देण्यास टाळाटाळ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. योवळी अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी याची गंभीर दखल घेत, हे अनुदान न वाटणा-या दोषी अधिका-यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले.
जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वच तालुक्यात शंभर टक्के पिक बाधीत झालेली असतांना अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांमध्ये नुकसानीची आकडेवारी कोणत्या आधारे कमी दर्शवण्यात आली, असा प्रतिप्रश्न उपस्थित करुन सर्व नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करत शेतक-यांना भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या.
वादळी चर्चा : आरोग्य अधिका-यांची चौकशी
यावेळी जयमंगल जाधव यांनी तत्कालीन आरोग्य अघिकारी गीते यांच्या १ कोटी ४६ लाख रूपयांच्या कामांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी गीतेंची विभागीय चौकशी सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले.
जिल्हा परिषदेतील विविध कामे ज्या एजंसींना देण्यात आली आहेत, ते दर्जेदार कामे करत नसल्याने त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली. योवळी धनादेश चोरी प्रकरणातील संशयीत आरोपींच्या एजंसीला काम कसे दिले असा सवालही त्यांनी केला.
यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर, सभापती दत्तात्रय बनसोडे, सौ. सुमनबाई घुगे, श्रीमती जिजाबाई कळंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांची उपस्थिती होती.

Web Title: Investigation of wells; Even with a grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.