अवैध वाळू उत्खनन; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:25 IST2020-02-09T00:25:03+5:302020-02-09T00:25:26+5:30
डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द दरोडा प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली.

अवैध वाळू उत्खनन; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द दरोडा प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत दोन वाहने, एक जेसीबीसह ८५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात जेसीबीद्वारे वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असाल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने शुक्रवारी रात्री डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात कारवाई केली. त्यावेळी नदीपात्रातून वाळू घेऊन जाणा-या वाहनाच्या (क्र. एम.एच.२१- डी.एच. २३८९) चालकाकडे रॉयल्टीबाबत विचारणा केली. चालकाने रॉयल्टीची कागदपत्रे नसल्याचे सांगितले. चौकशीत चालकाने आपले नाव शंकर कडूबा खंडाळे (रा. घाणेवाडी ता. जालना) व वाहन मालकाचे नाव समाधान दगडूबा पाळोदे (रा. टाकळी ता. भोकरदन) असल्याचे सांगितले. पोलिसांनी यावेळी सहा ब्रास वाळूसह वाहन जप्त केले. या कारवाईचा पंचनामा सुरू असताना नदीपात्रात एका विनानंबरच्या जेसीबीद्वारे एका वाहनात (क्र.एम.एच.-४२८९) वाळू भरण्यात येत असल्याचे दिसून आले. त्या वाहन चालकाकडे विचारणा केल्यानंतर त्यानेही रॉयल्टीची पावती नसल्याचे सांगितले. यावेळी जेसीबी, वाहनासह सहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तेथे असलेल्या चालकाकडे चौकशी केल्यानंतर वाहन चालकाने त्याचे नाव अर्जुन भीमराव लोहकरे (रा. मानदेऊळगाव ता.बदनापूर), वाहन मालक अर्जुन दगडूबा पाळोदे (रा. टाकळी ता. भोकरदन), जेसीबी चालक शेख शहारूख शेख अख्तर (रा. मुबारकपूर मेवत हरियाणा ह.मु.चिंचोली ता.भोकरदन), व जेसीबी मालक मधुकर साहेबराव हिवाळे (रा. चिंचोली ता.भोकरदन) असल्याचे सांगितले.
जेसीबी, दोन हायवा जप्त
या दोन्ही कारवाईत एक जेसीबी, दोन हायवा, वाळू असा एकूण ८५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला. या प्रकरणी संबंधित चालक, वाहन मालकांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, विजू निकाळजे यांच्या पथकाने केली.