Interstate gang looting under the guise of stock market exposed | शेअरमार्केटच्या नावाखाली लूटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

शेअरमार्केटच्या नावाखाली लूटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

ठळक मुद्देपाच जण जेरबंद १३ लाखाचा मुद्देमाल जप्त

जालना : बनावट वेबसाईटच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये चांगला मोबदला देण्याचे अमिष दाखवून ग्राहकांना लूटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्यप्रदेशातून पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या बँक खात्यातील पाच लाख रूपये फ्रीज करण्यात आले आहेत. तर संगणकासह इतर साहित्य असा एकूण १३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालना शहरातील चौधरीनगर भागात राहणारे शिक्षक लक्ष्मण कोंडीबा मुळे यांना शेअरमार्केटमध्ये चांगला नफा देण्याचे अमिष दाखवून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना शेअर मार्केटची माहिती देण्यात आली. विजय रावत, बिपीन रावत, आर्यन तोमर, राहुल जैन या नावाने कॉल करून प्रथम कमी रक्कमेत नफा मिळवून दिला. त्यानंतर १९ सप्टेंबर २०२० ते ३ आॅक्टोबर २०२० या कालावधीत मुळे यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर २ लाख ३२ हजार रूपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका जालना पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक यावरून तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. संबंधित कॉल सेंटर निमुच (मध्यप्रदेश) येथील असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले. या पथकाने इंदौर, मंदसौर, निमुच या जिल्ह्यात जाऊन आरोपींचा शोध घेत गणेशकुमार कैलासचंद्र केवट (२३), उमेश जगदीश गौर (२३ दोघे रा. कंवला, मंदसौर मध्यप्रदेश), श्रीकांत  देवकीसंजीत मिना (२२ रा.सांजलपूर मंदसौर, मध्यप्रदेश), मानसिंग रामदयाल गुजर (२३ रा. कंवला, मंदसौर मध्यप्रदेश) व हन्नी मंगल तोतला (२३ रा. बेगनपुरा जावद निमुच, मध्यप्रदेश) या पाच जणांना अटक करण्यात आली.  आरोपींनी वापरलेले दोन संगणक, हार्डडिस्क, लॅपटॉप, दोन वायफाय राऊटर, १२ मोबाईल, १५ डेबिडकार्ड, आठ विविध बँकांचे चेकबूक, एक कार, मोबाईल क्रमांकाच्या लिस्ट, नोटबूक जप्त करण्यात आले. तसेच आरोपींच्या बँक खात्यावरील पाच लाख रूपये फ्रीज करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण १३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोनि संजय लोहकरे, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, कर्मचारी तराळ, पितळे, जारवाल, राऊत, गुन्हे शाखेचे बाविस्कर यांच्या पथकाने केली.

आरोपी पोलीस कोठडीत
पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना २ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपींच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात व्यवहार दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील असंख्य नागरिकांची फसवणूक केल्याचा कायास बांधला जात आहे. कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Web Title: Interstate gang looting under the guise of stock market exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.