'बुलेट ट्रेन' मार्गी लावण्यासह नांदेड-मनमाड दुहेरीकरणास प्राधान्य : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 13:06 IST2021-08-23T13:04:21+5:302021-08-23T13:06:41+5:30
Raosaheb Danve News : मुंबई ते नागपूर ही बुलेटट्रेन झाल्यास गतीने प्रवास शक्य होणार असून, पुढील महिन्यात या मार्गाबाबतचा डीपीआर रेल्वे विभागाने तयार करण्याचे निर्देश

'बुलेट ट्रेन' मार्गी लावण्यासह नांदेड-मनमाड दुहेरीकरणास प्राधान्य : रावसाहेब दानवे
जालना : मुंबई ते नागपरू बुलेट ट्रेनची ( Mumbai - Nagpur Bullet Train ) व्हायबॅलेटी तपासून ती मार्गी लावण्यासह नांदेड ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केली. ( Initiative for Nanded-Manmad doubling with bullet train: Raosaheb Danve)
दानवे यांच्या उपस्थितीत जालन्यातील साडेचार कोटी रुपये खर्चाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दानवे म्हणाले, रेल्वेला सर्वांत मोठे उत्पन्न हे मालवाहतुकीतूनच मिळते. परंतु गेल्या काही वर्षात हे उत्पादन घटले असून, ही वाहतूक ८० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर येऊन पोहचल्याने रेल्वेला ३६ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. प्रवासी तिकिटांची भाडेवाड न करता रेल्वे खाते चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रेल्वेचे तिकीट एक रुपया असेल, तर त्यात ४८ पैसे नुकसान होते. हे नुकसान सरकार सहन करत असल्याचे दानवे म्हणाले.
रेल्वेचे उत्पन्न वाढीसाठी मुंबई दिल्ली कॅरिडोरला महत्त्व देण्यात येणार आहे. या प्रकल्पातून उभारण्यात येणाऱ्या रेल्वे मार्गावरून केवळ मालवाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे गतीने माल पोहोचविणे शक्य होणार आहे. पूर्वोत्तर राज्यांसाठीदेखील असाच कॅरिडोर राहणार असल्याचे ते म्हणाले. रेल्वेच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या आहेत. त्या जागांचे व्यापारीकरण करून तेथे मॉल तसेच हॉस्पिटल उभारण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीची रुग्णालयेदेखील सर्वसामान्यांसाठी खुली कशी करता येतील यावरही विचार सुरू असून, लवकरच निर्णय होणार आहे.
मुंबई ते नागपूर ही बुलेटट्रेन झाल्यास गतीने प्रवास शक्य होणार असून, पुढील महिन्यात या मार्गाबाबतचा डीपीआर रेल्वे विभागाने तयार करण्याचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांनी विचार मांडले. त्यांनीदेखील अनेक सूचना यावेळी केल्या. टोपे यांनी रेल्वेच्या प्रस्तावांसाठी राज्य सरकारची हवी ती मदत केली जाईल, असे सांगितले. यावेळी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भुपेंद्रसिंह, आमदार नारायण मुचे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत यांची उपस्थिती होती.
जालना ते खामगाव रेल्वेसाठी विचार करू
जालना ते खामगाव, जालना ते सोलापूर हे मार्गदेखील विचाराधीन आहेत, परंतु त्यासाठी व्हायबॅलिटी तपासण्यात येणार आहे. जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचा अहवाल पुढील महिन्यात नव्याने मागविण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे संघर्ष समितीनेदेखील मोठा पाठपुरावा केल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.