जालन्यात तब्बल २२ वाहनांतून आले आयकर अधिकारी, धाडीमुळे कर चुकवणारे धास्तावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:22 IST2025-10-30T19:15:57+5:302025-10-30T19:22:55+5:30
जालना शहरातील उद्योजक, व्यापारी, ट्रान्स्पोर्ट चालकांनी कर चुकविल्याचा संशय आयकर विभागाला आला होता.

जालन्यात तब्बल २२ वाहनांतून आले आयकर अधिकारी, धाडीमुळे कर चुकवणारे धास्तावले!
जालना : आयकर विभागाच्या मुंबई, नागपूर विभागाच्या पथकांनी गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी भल्या पहाटे जालन्यातील चार व्यापारी, उद्योजकांच्या आस्थापना, घरांवर धाडी टाकल्या आहेत. जवळपास २० वाहनांतून आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात दाखल झाले असून, आयकर विभागाच्या पथकांनी केलेल्या या कारवाईमुळे कर चुकविणाऱ्यांचे आणि अघोषित संपत्ती असणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
स्टील, बियाणे उद्योगासह कपडे, सराफा बाजारपेठेतील दैनंदिन उलाढाल कोट्यवधींच्या घरात असून, उद्योजक, व्यापाऱ्यांसह इतरांनी कराचा भरणा करावा, यासाठी वेळोवेळी आयकर विभागाकडून जनजागृतीची मोहीम राबवली जाते. परंतु, अनेकजण कर चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यापूर्वी जीएसटीसह आयकर विभागाने केलेल्या कारवायांमध्ये समोर आले आहे.
शहरातील उद्योजक, व्यापारी, ट्रान्स्पोर्ट चालकांनी कर चुकविल्याचा संशय आयकर विभागाला आला होता. त्या संशयावरून गुरुवारी पहाटे जवळपास २२ वाहनांतून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कर चुकविणाऱ्या चार उद्योजक, व्यापाऱ्यांच्या आस्थापना आणि घरांवर धाडी टाकल्या आहेत. या धाडीमुळे दिवसभर शहरातील व्यापारी, उद्योजकांमध्ये चर्चा होत होती. कागदपत्रांची तपासणी उशिरापर्यंत सुरू असल्याने कारवाईबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.