मालकाने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मजुरास मारहाण, हवेत गोळीबार केल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:09 IST2022-12-29T14:09:26+5:302022-12-29T14:09:38+5:30
हवेत गोळीबारप्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून आरोपी मोकाट आहेत

मालकाने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मजुरास मारहाण, हवेत गोळीबार केल्याने खळबळ
जालना : तुझ्या मालकाने आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार का दिली, असे म्हणत सहा संशयितांनी शेतात काम करणाऱ्या एकास रॉड व काठीने मारहाण केली. तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना चंदनझिरा पोलिस ठाणे हद्दीतील तांदूळवाडी शिवारात समृद्धी महामार्गालगत मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही आरोपी मोकाटाच आहे.
तांदूळवाडी येथील लहू अशोक शिंदे हे तांदूळवाडी शिवारातील समृद्धी महामार्गालगत एका शेतात काम करीत असताना संशयित रवी बाळू जाधव, पृथ्वीराज रवी जाधव, ऋषी जाधव (रा. सर्व, कैकाडी मोहल्ला), आकाश दगडू पवार (रा. घाणेवाडी) व अन्य दोघेजण तिथे आले. त्यांनी लहू शिंदे यांना जातिवाचक शिवीगाळ केली. तुझ्या मालकाने आमच्याविरुद्ध तक्रार का दिली, असे म्हणत त्यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. यात शिंदे गंभीर जखमी झाले. रवी जाधव याने त्याच्याकडील पिस्तुलाने हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर चंदनझिरा ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही. जी. शिंदे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, जखमी शिंदे यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध ॲट्राॅसिटी, ऑर्म ॲक्ट व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, अद्यापही आरोपी मोकाट आहे.